तामलवाडी : तुळजापूर ते तामलवाडी या २२ कि.मी. अंतरावर सहा बसथांबे असून, यापैकी केवळ दोन गावांत प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. त्यांचीही दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या मार्गावरील चार ते पाच गावच्या प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस आदींचा सामना करीत झाडाखाली बसूनच एस. टी. ची वाट पहावी लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने ३५ वर्षापूर्वी माळुंब्रा व तामलवाडी या दोन गावात प्रवासी निवारे उभारले. त्याचा वापर काही दिवस झाला. नंतर त्याचीही मोडतोड होऊन तो ओस पडला. त्याच्यासमोर टपरीधारकांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटली. माळुंब्रा गावातील प्रवाशी निवारा हा गुरांचा गोठा बनला असून, समोर मोठ्या प्रमाणात उकिरडाही साचला आहे. शिवाय बसगाड्याही शाळेजवळच थांबत असल्याने निवारा असूनही वापरात येत नसल्याचे दिसते. सिंदफळ, सांगवी (मार्डी), सांगवी (काटी), सुरतगाव या गावच्या थांब्यावर निवारा नसल्याने प्रवाशांना झाडाचा आधार घ्यावा लागत आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चार गावातून दररोज शेकडो प्रवाशी एस.टी.ने प्रवास करतात. विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. एस.टी.ची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना निवाराही नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. चार गावात निवाऱ्याची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी सुरतगावचे अण्णासाहेब गुंड, सांगवीचे आप्पाराव मगर, श्रीकांत सांगवीकर, साधू शिंदे यांनी केली आहे. (वार्ताहर)तामलवाडीत तरुणांचे योगदान तामलवाडी येथे पोलिस ठाण्यालगत असलेला प्रवाशी निवारा अतिक्रमणात अडकला होता. ग्रामपंचायत सदस्य चनाप्पा मसूते, सुधीर पाटील, महेश जगताप, नागेश राऊत आदी तरुणांनी पुढाकार घेऊन तेथील पानटपऱ्या हटवून हा निवारा मोकळा केला. समोरची साफसफाई करुन लोकवर्गणीतून निवाऱ्याची दुरुस्ती केली. आज हा निवारा प्रवाशांच्या वापरात आहे. आमदार फंडातून निवाऱ्याची सोय करासोलापूर जिल्ह्यात आमदार फंडातून प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे. तशी व्यवस्थाही तुळजापूर तालुक्यातील बसथांब्यावर करावी. तेथील निवारे हे लोखंडी बांधणीतून तयार केलेले आहेत. अशी सोय तुळजापूर ते तामलवाडी रस्त्यावरील गावात करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
झाडाखाली बसूनच प्रतीक्षा
By admin | Published: July 14, 2014 11:52 PM