उस्मानाबाद : गावो-गावच्या लाल मातीत होणारी स्पर्धा, जिंकण्यासाठीची मेहनत आणि पहाटेच नव्हे तर रात्री १० पर्यंत घाम गाळणारे खेळाडू़, हे कबड्डीचे चित्र आज जिल्ह्यात अभावानेच दिसत आहे. शालेय स्तरावर जिल्ह्याचे संघ गाजत असले तरी कबड्डीची मैदाने मात्र, ओस दिसून येतात़ खुल्या गटातून घाम गाळण्याची उर्मिही आता दिसून येत नसल्याची खंत कबड्डीच्या ज्येष्ठ खेळाडुंनी व्यक्त केली़ मंगळवारी साजरा होत असलेल्या कबड्डी दिनानिमित्त ‘लोकमत’ने ज्येष्ठ खेळाडूंशी संवाद साधला़ यावेळी ते बोलत होते.सध्या क्रिकेट ज्वराने आबालवृध्दांनाही पछाडले असले तरी एकेकाळी कबड्डीच्या मैदानावर उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडुंचा दबदबा होता़ १३ बाय १० च्या कबड्डी मैदानावर राज्य, राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव गाजविले ते बबन लोकरे, विश्वनाथ खळदकर या कबड्डी पटूंनी, १९८५-९० पर्यंत जिल्ह्यातील शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील गल्ली बोळात कबड्डीची मैदाने होती़ मैदानावरील लाल मातीत रात्रंदिन घाम गाळून आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील होता़ क्रिकेटच्या स्पर्धेप्रमाणे कबड्डीच्याही स्पर्धा होत असत़ कबड्डीच्या मैदानावर जिल्ह्यातून प्रथमत: बबन लोकरे यांनी राज्य संघात सहभाग नोंदविला़ त्यांनी राज्याकडून खेळताना सुवर्णपदक पटकाविले़ तर त्यांच्यानंतर विश्वनाथ खळदकर यांनी ही किमया साधली. खुल्या गटातून कबड्डीच्या मैदानावर वर्चस्व राखणाऱ्या या खेळाडुंनी जिल्ह्यातील कबड्डीच्या इतर खेळाडुंना मोठी प्रेरणा दिली़ अविनाश बेगडेकर, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कारप्राप्त अशोक मगर, भाऊसाहेब उंबरे, गणपत पाटील, बाळू कणसे, सचिन शिंदे, नितीन हुंबे, अप्पासाहेब हुंबे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त शाम जाधवर, अशा अनेक खेळाडुंनी नंतरच्या काळात कबड्डीच्या मैदानावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला़ २० व्या शतकात जिल्ह्यातील खेळाडूंना किक्रेट ज्वराने ग्रासल्याने कबड्डीची मैदाने ओस पडू लागली़ सद्यस्थितीत शालेय संघातील सहभाग मोठ्या प्रमाणात असला तरी खुल्या गटातील संघात खेळाडूंची भरतीही होताना दिसत नाही़ १० ते १५ वर्षापासून जिल्ह्याला खुल्या गटातून एखादे पदक मिळाले, असा दाखलाही कोणी देत नाही़ खुल्या गटात पुरूषांचा संघ तयार होत नाही, त्यामुळे महिला संघाचा तर विचार करणेच मुश्किल झाले आहे़ (प्रतिनिधी)कष्ट करण्याची तयारी नाहीमी १९६३ ते ७२ पर्यंत कबड्डीच्या मैदानावरील खेळाचा भरपूर आनंद उपभोगला़ १९६५-६६ च्या काळात राज्य संघाकडून खेळताना सुवर्ण पदकही पटकाविले़ आमच्या काळात पहाटेपासून ८ वाजेपर्यंत तर सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंतही सराव व्हायचा़ गावो-गावी कबड्डीचे संघ होते़ मोठ्या स्पर्धाही होत असत़ त्या काळातील कबड्डीची भरभराट आता दिसून येत नाही़ शालेय स्तरावर खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत़ मात्र, खुल्या गटातून कबड्डी संघात खेळण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ कबड्डी हा घाम गाळणाऱ्यांचा, मैदानावर कष्ट करणाऱ्यांचा खेळ आहे़ मात्र, आजच्या पिढीत कष्ट करण्याची वृत्ती दिसत नसल्याची खंत ज्येष्ठ खेळाडू बबन लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़१२ वर्षानंतर वडजेची निवडमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येते़ कुमार गटातून १२ वर्षानंतर २०१३-१४ साठी बावी आश्रमशाळेतील मिथून वडजे या विद्यार्थ्याची निवड झाली होती़शालेय स्तरावर नावलौकिकबावी आश्रमशाळा, कोथळा येथील ज्ञानयोग विद्यालय, नळदुर्ग येथील कला वाणिज्य विद्यालयातील शालेय मुला-मुलींच्या संघाने जिल्ह्याला राज्यपातळीवर पदके मिळवून दिली आहेत़ रूपाली नागरगोजे, पमाकांत जाधव, दीपक वडजे, मिथुन वडजे, शीतल शिंदे आदी विविध खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, बावी गावाने काही प्रमाणात आजही कबड्डीचे मैदान राखल्याचे दिसून येते.
कबड्डीची मैदाने ओस़़
By admin | Published: July 14, 2014 11:57 PM