औरंगाबाद : चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान भरविण्यात येणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. मात्र, मुख्य अभिषेक सोहळा भाविकांना घरबसल्या ऑनलाईन पाहता येईल, अशी व्यवस्था मंदिराच्या विश्वस्तांनी केली आहे.
दरवर्षी यात्रेनिमित्ताने राज्य- परराज्यातून हजारो भाविक कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी येत असतात. तसेच शेकडो भाविक पायी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा रद्द केली आहे. यामुळे २९, ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरदरम्यान भाविकांसाठी मंदिर बंद असणार आहे. पूजाविधीसाठी मोजक्या लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्य अभिषेक सोहळा सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे. हा सोहळा भाविकांना घरबसल्या ऑनलाईन पाहता येणार आहे.
कचनेर ग्रामपंचायतने स्वच्छता राखण्यासाठी पथक नेमले आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. पंचक्रोशीतील तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांनी कचनेरमध्ये येऊ नाही. पदयात्राही काढू नये, असे आवाहन, मंदिर विश्वस्तांनी केले आहे.