औरंगाबाद : शिवाजीनगर परिसरात सोमवारी सकाळी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या विवाहितेला तिच्या पतीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या या तरुणीच्या स्वप्नांना सुरूंग लावत तृतीयपंथियांसाेबत राहणाऱ्या तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार तिच्या आईने मंगळवारी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.
गणेश आप्पासाहेब उगले (२६,रा. काबरानगर,गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. स्मिता ऊर्फ रिंकू गणेश उगले असे मृत विवाहितेचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी स्मिताच्या आईने तक्रार नोंदविली आहे. यानुसार गणेश आणि स्मिता यांनी १ नोव्हेंबरला आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. काही दिवस चांगले वागविल्यानंतर वाहनचालक असलेल्या गणेशने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो नेहमी शिवाजीनगर येथील तृतीयपंथियांसोबत राहतो. हे स्मिताला मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात वाद होत आणि तो तिला मारहाण करी. याबाबतची माहिती स्मिताने अनेकदा फोन करून आणि प्रत्यक्ष भेटूनही आईला सांगितली तेव्हा या नवविवाहित जोडप्याची स्मिताच्या आईने समजूत काढली होती. त्यानंतरही त्यांच्यात वाद होत आणि तो तिला मारहाण करत होता. अखेर स्मिता रविवारी रात्री घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाजीनगर परिसरातील रुळावर तिने रेल्वेसमोर स्वत:ला झाेकून देत आत्महत्या केल्याचे आढळले. गणेशने तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत शेळके तपास करीत आहेत.
कढी-भजे करण्यावरून झाला वाद
रविवारी रात्री कढी-भजे करण्यावरून पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर ती घराबाहेर पडली. मात्र, याबाबतची माहिती गणेशने तिच्या आई-वडिलांना कळविली नाही. एवढेच नव्हे तर तिचा शोधही घेण्याचा प्रयत्न त्याने केला नाही.