छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने कैलासनगर ते एमजीएम रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या १३ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून २४ तासांत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात एक तीन मजली इमारतदेखील बाधित होत आहे. संबंधित मालमत्ताधारकाला जागेचा मोबदला द्यावा लागेल. जालना रोडला समांतर म्हणून लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता २० वर्षांपूर्वी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला, अजूनही त्या रस्त्याचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. कैलासनगर स्मशानभूमीच्या पुढे नाल्यावर काही मालमत्तांमुळे रस्त्याचे काम थांबले.
मालमत्ताधारक मनपा विरोधात न्यायालयात गेल्याने पुन्हा रस्ता वळविला. नव्या मार्किंगनुसार रस्त्यात १३ मालमत्ता बाधित होत आहेत. १३ मालमत्ताधारकांना पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गुरुवारी नोटिसा बजावल्या. या बांधकाम २४ तासांच्या आत काढून घ्यावे, असे नोटीसमध्ये नमूद आहे. रस्ता वळविल्यानंतर जास्त मालमत्ता बाधित होत आहेत. त्यातील अनेक मालमत्ता नियमित असून, त्यात एका तीन मजली घराचा समावेश आहे. ज्यांनी नियमानुसार बांधकाम केले आहे, त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. असे सूत्रांनी सांगितले.