संजय तिपाले , बीड कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचे आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न असतात; परंतु मागील वर्षी १३ शस्त्रक्रिया चक्क ‘फेल’ ठरल्या आहेत़ आरोग्य विभागाकडून आता या सर्व मातांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे़ ‘छोटे कुटंब- सुखी कुटुंब’ असा संदेश देऊन लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात़ त्यानुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुटुंबकल्याण शिबिरे आयोजित केली जातात़ गतवर्षी जिल्ह्यात १५ हजार कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आले होते़ प्रत्यक्षात उद्दिष्टापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़ मात्र, शस्त्रक्रिया केल्यानंतरही १३ मातांना गर्भधारणा झाली़ त्यामुळे त्यांना कुटुंबकल्याण नुकसान भरपाई योजनेंतर्गत प्रत्येकी ३० हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाणार आहे़ पूर्वी हे प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यस्तरावरील विमा कंपन्यांकडे जात होते़ यावर्षीपासून मात्र, जिल्हा स्तरावरुनच भरपाई मिळणार आहे़ जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षेतखालील गुणवत्ता अभिवचन समिती या प्रस्तावांना मंजुरी देणार आहे़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शस्त्रक्रिया ‘फेल’ झालेल्या मातांना भरपाई मिळावी म्हणून प्रस्ताव तयार केले आहेत़ हे प्रस्ताव गत आठवड्यात जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़ प्रस्तावांना मंजुरी मिळताच भरपाईची रक्कम संबंधितांना वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ माता मृत्यूनंतर दोन लाखांची भरपाई कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ‘फेल’ ठरली तर अनावश्यक गर्भधारणा होते़ त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते़ अनावश्यक प्रसूतीवेळी मातेचा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये इतकी भरपाई दिली जाते़ राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ असफल शस्त्रक्रिया तालुकाप्रस्ताव केज २ पाटोदा२ माजलगाव २ परळी २ बीड १ अंबाजोगाई २ धारुर२ एकूण१३
‘कुटुंबकल्याण’चे ‘टाके’ ढिलेच !
By admin | Published: June 01, 2014 12:11 AM