- राम शिनगारे
औरंगाबाद : जगप्रसिद्ध शिल्प वेरूळ लेणीच्या कुशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महादेव, गौतम बुद्धांसह थोरामोठ्यांची शेकडो शिल्पे एक कलासक्त दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून घडविते आहे. त्यांच्या मुशीतून तयार झालेली शिल्पे औरंगाबादपासून दिल्लीपर्यंतच्या भारतीयांना प्रेरणा देत आहेत. नरेंद्रसिंग साळुंके आणि स्वाती साळुंके असे या कलाप्रेमी दाम्पत्याचे नाव.
खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर अवतरलेय हे कलातीर्थ. ना कोणताही नामफलक ना ओळख पटावी अशी खूणगाठ. अशा ठिकाणी शतकुंडा आर्ट ॲण्ड मेटल फाउंड्री उभी आहे. साळुंके दाम्पत्य तेथेच निवास करते. कोणत्याही प्रकारच्या मशनरी न वापरता महाकाय असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह थोरांचे शिल्प ते लिलया साकारतात. कला संचालनालयाची मान्यता असल्याशिवाय महापुरुषांचे शिल्प ते बनवित नाहीत. या दाम्पत्याने कलेच्या क्षेत्रातील उच्चशिक्षण घेतले असून, त्यांची मोठी मुलगी मुंबईतील नामांकित जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचेच शिक्षण घेत आहे.
असे बनवितात शिल्पछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर शिल्पे तयार करण्यापूर्वी प्रारंभी मातीकाम (क्ले) करून शिल्प बनविले जाते. त्याचे मॉडेल फायबरमध्ये रूपांतरीत होते. त्यानंतर मेणाची कॉपी मोल्ड भाजून मेटल टाकले जाते. त्यानंतर ब्रान्झ मेंटलचे शिल्प घासून-पुसून आकर्षकपणे तयार केले जाते. एका शिल्पासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात ध्यानस्थ होऊन शिल्प बनविण्याचा आविष्कार अहोरात्र सुरू आहे.
विद्यापीठातील शिल्पाचे काम अंतिम टप्प्यातडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बुलडाणा येथील छत्रपतींच्या शिल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय या दाम्पत्याने पैठण, गंगापूर, छत्रपती स्मारक, रायगड आणि लातूर जिल्ह्यात छत्रपतींची २६ शिल्पे तयार करून दिली आहेत. गंगापूर नगरपालिकेतर्फे बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही शिल्पाचे काम सुरू आहे. औरंगाबाद, नाशिक विमानतळ, औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटल, तापडिया, संत तुकाराम, बाळासाहेब ठाकरे स्मारक, समृद्धी महामार्ग, दिल्लीतील विविध म्युरल्स, कलाकुसर आदी कामे या दाम्पत्याने केली आहेत.