सिल्लोड: तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी रात्री ८ ते १० वाजता हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत रुद्राक्ष वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी कालीचरण महाराज व आयोजकांनी मार्गदर्शन करताना दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दिल्याने रविवारी रात्री कालीचरण महाराज व सिल्लोड येथील भाजपच्या शहराध्यक्ष सहित चार लोकांविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या मध्ये हिंदू जागरण समितीचे कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग ( रा.अकोला) , सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया (कार्यक्रमाचे आयोजक), या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते सुनिल त्र्यंबक जाधव (मोढा बुद्रुक), आरएसएसचे बौद्धिक जिल्हाप्रमुख केतन कल्याणकर (रा.सिल्लोड) या चार लोकांविरुद्ध पोलीस कर्मचारी यतीन कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारवरून गुन्हे दाखल करण्यात आले.
सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी दि १३ मे रोजी कालीचरण महाराज यांच्या हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि.१४ रोजी रात्री सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी विविध कलमान्वये हे गुन्हे दाखल केले.कालीचरण महाराज यांनी या सभेत भडकावू भाषण दिले दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले. इतर आयोजकांनी चिथावणी दिली नियम व अटींचे पालन केले नाही म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी सांगितले.
भाजप पदाधिकाऱ्यांची गुन्हे मागे घेण्याची मागणीसदर सभेत राडा झाला नाही कुणाची मने दुखावली नाही किंवा कुणी नागरिकांनी यावर आक्षेप घेतला नाही केवळ राजकीय षडयंत्रामुळे पोलिसांनी दबावाखाली भाजप पदाधिकारी व कालीचरण महाराज यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले हे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी जेष्ठ नेते सिध्देश्वर अर्बन बँकेचे चेअरमन प्रभाकरराव पालोदकर, भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, हिंदू जनजागरण मंचचे मनोज मोरेल्लू, माजी नगरसेवक सुनील मिरकर, विष्णू काटकर,मधुकर राउत,भाजपा व्यापारी आघाडी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, सिल्लोड शहर अध्यक्ष प्रशांत चिनके,सुनिल प्रशाद, विलास पाटील, शामराव आळणे, संतोष ठाकुर, प्रकाश भोजवाणी,नंदू श्रीवास्तव, अतुल प्रशाद,मयूर कुलकर्णी, दादाराव आळणे,अनमोल ढाकरे,नंदू वाघ, राजू गायकवाड,आदी पदाधिकारी यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांची भेट घेऊन केली आहे.
हे राजकीय षडयंत्र आहेमोढा येथे हिंदू जनजागरण सभा झाली त्यात कुणाचे मन दुखेल असे वक्तव्य आम्ही केले नाही. केवळ हिंदू लोकांना जागृत करण्याचे काम आम्ही करत आहोत. हनुमान चाळीसा गावागावात पठण करत आहोत. यामुळे राजकीय दबावापोटी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.- कमलेश कटारिया भाजप शहर अध्यक्ष सिल्लोड.