औरंगाबाद: जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे यांची तर शहराध्यक्ष पदी हिशाम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. काळे हे माजी आमदार आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती.परंतु भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा पराभव केला. डॉ काळे हे सध्या जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या नाराजीनाट्यानंतर तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री अनिल पटेल यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यकारी कार्यभार होता. तो त्यांनी आतापर्यंत सांभाळला.
शहराध्यक्षपदी हिशाम उस्मानी यासोबतच शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी हिशाम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आतापर्यंत किसान कांग्रेसमध्ये सक्रिय होते. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांची जवळीक आहे. औरंगाबाद शहराचा अध्यक्ष मुस्लिम समाजातील असावा ही फार दिवसांपासूनची मागणी होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली. अर्थात हिशाम उस्मानी यांच्यापेक्षाही ज्येष्ठ कार्यकर्ते या पदासाठी दावेदार होते पण त्या सर्वांवर मात करून उस्मानी यांच्या गळ्यात ही माळ पडल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे.