वाळूज महानगर : कमळापूर शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक ऊसाला आग लागली. यात जवळपास अडीच एकर ऊस जळून भस्मसात झाला आहे. अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरील प्लास्टिक कचरा पेटविल्याने ऊसाला आग लागली असावी, असा अंदाज ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे.
कमळापूर शिवारात गट नंबर ५३ मध्ये अफजलबी रफिक पठाण यांची साडे आठ एकर शेती असून, अडीच एकरवर ऊस लागवड केली आहे. सध्या ऊस तोडणीला आल्याने शनिवारपासून पाणी बंद करण्यात आले. शुक्रवारी दुपारी २ वाजता चाँदखाँ पठाण हे नमाज अदा करुन शेतात गेले असता त्यांना ऊसाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती फोनवरुन रफिक पठाण यांना दिली. रफिक पठाण यांच्यासह अन्य नातेवाईकांनी शेताकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ऊसाने चांगलाच पेट घेतला. आगीने रौद्र रुप धारण केल्याने त्यांनी ही माहिती वाळूज एमआयडीसी अग्निशमन केंद्राला कळविली.
अग्निशमन जवानांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दीड ते दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यात जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे रफिक पठाण यांनी सांगितले. आग विझविण्यासाठी रफिक पठाण, अरिफ पठाण, रऊफ शेख, हनीफ शेख, गणी शेख, कल्याण साबळे, कल्याण भुजंग, अमोल लोहकरे, ईस्माईल शाह, नजीरखाँ पठाण आदीसह अग्निशमन जवानांनी परिश्रम घेतले.
कचरा पेटविल्यामुळे लागली आगवाळूज-कमळापूर रस्त्यावर प्लास्टिक कचरा टाकण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने तसाच पडून आहे. अज्ञात व्यक्तीने प्लास्टिक कचरा पेटवून दिला असावा. वाºयामुळे पेटलेला कचरा उडून ऊसात गेल्याने ऊसाला आग लागली असावी, असा अंदाज ऊस उत्पादक शेतकरी पठाण यांनी व्यक्त केला.