औरंगाबाद : घाटीच्या नवजात शिशू विभागांतर्गत कोटी रुपये खर्चाचे महत्त्वाकांक्षी कांगारू मदर केअर युनिट उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला. या ३० खाटांच्या स्वतंत्र वाॅर्डात ३० माता एकाच वेळी तान्हुल्याला कांगारू केअर देऊ शकतील, अशी व्यवस्था राहणार आहे. त्यातून जन्मानंतर प्रकृती गंभीर असलेल्या नवजात शिशूंचा प्राण वाचण्यास मोठा हातभार लागणार आहे.
‘सीएसआर’ फंडातून कांगारू मदर केअर वाॅर्ड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागाही निश्चित झाली आहे. यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. प्रस्तावित बांधकामाची अंदाजपत्रकीय रक्कम १ कोटीपेक्षा कमी असल्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अथवा संस्थास्तरावर प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.
याबरोबर बजाज ऑटोअंतर्गत असलेल्या जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेतर्फे (पुणे) ‘सीएसआर’ निधीतून तळमजला आणि ३ मजली व्याख्यान कक्षाच्या इमारतीच्या उभारणीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून ही इमारत उभी राहणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
६ महिन्यांत उभारणी
बाळाला छातीशी ठेवून उबदार कपडा स्वत:भोवती गुंडाळून आराम खुर्चीवर बसावे किंवा बेडवर झोपावे, अशी कांगारू केअरची संकल्पना आहे. आगामी ६ महिन्यांत हा वाॅर्ड उभारला जाईल, असे नवजात विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.