औरंगाबाद : कन्नड शहरात कमी तीव्रतेचा इंप्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (एलईडी) बॉम्ब ९ जून रोजी आढळून आला होता. बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्याला सुरक्षितपणे हाताळून निर्जनस्थळी नेऊन नष्ट केले. हा बॉम्ब एका बारावी उत्तीर्ण व इलेक्ट्रिकल्सचे काम करणाऱ्या युवकाने मित्राला धडा शिकविण्यासाठी तयार करून ठेवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कन्नड शहरातील मुख्य रस्त्यावरील एका फर्निचरच्या दुकानासमोर मोबाईलच्या रिकाम्या बॉक्समध्ये कमी तीव्रतेचा एलईडी बॉम्ब ९ जून रोजी आढळला. हा बॉम्ब निकामी केल्यानंतर अधीक्षक कलवानिया यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड पोलिसांची चार पथके तपासासाठी तयार केली. घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तांत्रिक तपासात रामेश्वर ज्ञानेश्वर मोकासे (वय २६, रा. म्हाडा कॉलनी, कन्नड) याचा गुन्ह्यात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आला. रामेश्वर हा इलेक्ट्रिकच्या वस्तू दुरुस्त करण्याचे काम करतो. त्याचे हिवरखेडा रोडवर न्यू स्वराज इलेक्ट्रिकल व रुद्रा रेफ्रिजरेशन नावाचे दुकान आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. रामेश्वरचा मित्र दिनेश राजगुरु (रा. कन्नड) याच्यासोबत दोन वर्षांपासून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार होता.
दिनेशकडून काही पैसे येणे बाकी होते. ते देण्यास तो टाळाटाळ करीत होता. दिनेशचा चुलत भाऊ किरण यालाही रामेश्वरने दिनेशला समजावून सांगण्याची विनंती केली. त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे रामेश्वरने राजगुरुस धडा शिकविण्यासाठी कमी तीव्रतेचा एलईडी बॉम्ब तयार केला. हा बॉम्ब किरणच्या दुकानासमोर घातपात करण्याच्या उद्देशानेच ठेवला असल्याची त्याने कबुली दिल्याची माहिती अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली. यावरून रामेश्वरला कन्नड पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कामगिरी अधीक्षक कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, निरीक्षक रामेश्वर रेंगे, रवींद्र तळेकर, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे यांच्या पथकांनी केली.
आरोपी उच्चशिक्षित कुटुंबातीलरामेश्वर मोकासे हा एमसीव्हीसी उत्तीर्ण असून, त्याने आयटीआयला प्रवेश घेतला होता. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. त्याचे वडील एस.टी. महामंडळात मेकॅनिकल म्हणून कामाला आहेत. त्यामुळे तोही इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणे, बसविण्याचे छोटे-मोठे कंत्राट घेत होता. रामेश्वरचा एक भाऊ अभियंता असून, दुसरा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उच्चशिक्षित कुटुंबातील सदस्य असतानाही त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर चुकीच्या कामासाठी केल्याची चर्चा आहे.