औरंगाबाद : कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु शिवसेना आणि भाजपने कन्नडला डावलल्याचा आरोप आ. हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केला आहे. इतर तालुक्यांतील आणेवारी ५३ पैशांंच्या आसपास आहे. कन्नडची आणेवारी ५० पैशांखाली आलेली आहे. असे असताना त्या तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे, असे जाहीर करण्यामागे राजकारणच आहे, असेही ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी शासनाने मराठवाड्यातील २७ जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये १४ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर दुष्काळाच्या छायेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये कन्नड तालुक्याचा समावेश मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. त्यांच्या लक्षात स्थानिक परिस्थिती आलेली असताना त्यांनी असे का करावे, असा प्रश्न आहे. मी लोकसभा लढणार असल्याची भीती तर या दोन्ही पक्षांनी घेतली असावी, त्यामुळेच त्यांनी कन्नडमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ नसल्याचे जाहीर केले. दुष्काळाची पाहणी तीन टप्प्यांत होते. तिसऱ्या टप्प्यापर्यंत जर कन्नडमध्ये दुष्काळ जाहीर केला नाहीतर सरकारच्या तोंडाला फेस येईपर्यंत आंदोलन उभारण्याचा इशारा आ.जाधव यांनी दिला.
शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू४६ पैसे आणेवारी आलेली आहे. ही आणेवारी दुष्काळ पाहणीतूनच समोर आलेली आहे. असे असताना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ कसा काय होऊ शकतो. शिवसेना आणि भाजपनेच यामागे राजकारण केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत शासनाने कन्नडमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली नाहीतर शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आ. जाधव यांनी दिला.