कन्नड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनदेखील या पिकांचा विमा न मिळाल्याने शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे शेती उत्पादित कोणत्याही पिकाला भाव नाही. तशातच निसर्गही कोपल्याने शेतकरीवर्ग पुरता नागवला गेला आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदतीचा हातभार लागेल, या आशेपोटी गेल्यावर्षी तालुक्यातील २९ हजार १०६ शेतकऱ्यांनी कापूस, तर ४७,८८२ शेतकऱ्यांनी मक्याचा विमा उतरविला होता. मात्र, मुख्य पीक असलेल्या कापूस व मका पिकाचा विमा मिळालाच नाही. उडीद आणि मूग पिकांच्या विम्यापोटी ४,७५० शेतकऱ्यांना ९४ लाख रुपये मिळाले आहेत. तर टोल फ्री क्रमांकावर पीक नुकसानीबाबत तक्रार केलेल्या ३९३ शेतकऱ्यांना ११ लाख ३१ हजार रुपये मिळाले आहेत.
----
पाच वर्षांत मका व कापूस पिकांचा हेक्टरी उत्पादकता अहवाल :
कापूस पीक :
२०१६-१७ : १४०२ किलो
२०१७-१८ : ५५१ किलो
२०१८-१९ : ६२० किलो
२०१९-२० : ६४८ किलो
२०२०-२१ : ११८२ किलो
-----
मका पीक
२०१६-१७ : ४९०८ किलो
२०१७-१८ : ३६९९ किलो
२०१८-१९ : १६९८ किलो
२०१९-२० : १०८१ किलो
२०२०-२१ : ३३७७ किलो
---
७,२९५ शेतकऱ्यांचा समावेश
तालुक्यातील चिंचोली (लिं.), करंजखेडा, नाचनवेल, कन्नड व चापानेर या पाच महसूल मंडलातील २२ गावांना २० मार्चपासून सतत चार दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला होता. महसूल व कृषी विभागाच्या वतीने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील ७,२९५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला, तर ३.४० कोटींचा मदत निधी (अनुदान) प्रस्ताव शासनाकडून पाठविण्यात आलेला होता.