औरंगाबाद : एटीएममध्ये पिन जनरेट करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पिन नंबर चोरून पाहिल्यानंतर त्यांच्या खात्यातील १० हजार रुपये परस्पर काढून फसवणूक करणाऱ्या कानपुरी (उत्तर प्रदेश) गँगमधील एकाला जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
गौरव ओमप्रकाश पांडे (३१, श्यामनगर, कानपूर), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. तक्रारदार विकास दामोदर सोळुंके हे सुरक्षारक्षक आहेत. त्यांना बँकेकडून नुकतेच एटीएम कार्ड प्राप्त झाले. मंगळवारी दुपारी ते सूतगिरणी चौक येथील एटीएम सेंटरवर नवीन पिन नंबर तयार करण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे आरोपी आणि त्याचे साथीदार उभे होते. तक्रारदारांनी पैसे काढल्यानंतर ते व्यवहार बंद न करता एटीएम सेंटरमधून बाहेर पडले. त्याचवेळी आरोपी आत घुसले. त्यांनी व्यवहार पुन्हा सुरू करून विकास यांच्या खात्यातून प्रथम पाचशे रुपये आणि नंतर ९ हजार ५०० रुपये काढून घेतले. खात्यातून १० हजार रुपये काढल्याचे मेसेज विकास यांना प्राप्त होताच ते घराकडील रस्त्यातून परत एटीएम सेंटरकडे गेले तेव्हा आरोपी गौरव आणि त्याचे साथीदार उभे दिसले. त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांनी जवाहरनगर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि संशयित आरोपी गौरवला पकडले. त्याचा साथीदार यावेळी पोलिसांना पाहून पळून गेला. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.