- कैलास पांढरे
के-हाळा (ता. सिल्लोड) : आपल्याला शाळा म्हटले, की गुरुजी शिकवतात ती शाळा आठवते; परंतु के-हाळावासीयांनी आगळीवेगळी भक्तीची शाळा भरविली आहे. वारकरी संप्रदायाशी निगडित विठ्ठलनामाची शाळा सध्या या भागात चर्चेत आहे. गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी अख्खे गाव एक कोटी विठ्ठलनामाचे लिखाण करण्यात तल्लीन झाले आहे. यात लहान मुले, तरुणाईसह वृद्ध महिला, पुरुष मंडळीही दिवसभर नामलिखाण करताना दिसतात. सर्व जण भक्तीत रमल्याने मोबाईल व सोशल मीडिया जरा गावापासून दूर गेला आहे.
के-हाळा येथे १०० वर्षे पुरातन महादेव मंदिर असून, त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिराची पडझड सुरू झाली. गावकऱ्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि बघता-बघता आठ महिन्यांतच तब्बल जवळपास ५० लाख रुपयांवर रक्कम जमा झाली. काही ग्रामस्थांनी श्रमदानाची तयारीही दाखविली. जमलेली रक्कम व श्रमदान करण्याची इच्छा दाखविल्यामुळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने या मंदिराचा कायापालटच झाला.
मंदिरच नव्हे, पर्यटनस्थळाचाही भासनुसते मंदिरच नव्हे, तर एक पर्यटनस्थळच यातून तयार झाले. पन्नास फूट उंच मंदिर, ग्रामस्थांना बसण्यासाठी भव्य सभामंडप, महिलांसह लहान मुलांना प्ले ग्राऊंड, सुसज्ज गार्डन, चकाचक रस्ता, पार्किंग, शांतता, अशा सगळ्या गोष्टी येथे बघायला मिळत आहेत.गावाच्या एकीतून एवढी क्रांती घडेल, असा ग्रामस्थांनी कधी विचारही केला नव्हता. त्यांच्यासाठी ही नवलाईच ठरली आहे. विशेष म्हणजे मोबाईलचे वेडही गावात कमी झाले आहे.
रामभाऊ महाराजांचे आव्हान स्वीकारलेया मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत (गंगापूर) यांनी यावे म्हणून ग्रामस्थांनी त्यांना आग्रह केला; परंतु महाराजांनी नकार दिला. पुन्हा ग्रामस्थांनी विनंती केली. यावर महाराजांनी एक कोटी विठ्ठलनामाचा जप करून तो लिहिण्याची अट गावकºयांना घातली. हे लिखाण पूर्ण झाल्यावरच मी गावात येईन, असे महाराजांनी सांगितल्याने गावकºयांनीही हे आव्हान स्वीकारून विठ्ठलनामाची शाळा भरवली आहे.
मे महिन्यात तीनदिवसीय कार्यक्रमगावात ९० टक्के नामलिखाण पूर्ण झाले आहे. दि. ८, ९ व १० मे रोजी गावात तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा राऊत महाराजांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी संपूर्ण १ कोटी नामलिखाणाच्या वह्या जमा करण्यात येणार आहेत. गावकºयांच्या या भक्तीला ‘सलाम!’