औरंगाबाद : जॉर्डनमधील अमन या शहरात २ ते ८ मार्चदरम्यान रंगणाऱ्या आशियाई तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील कशिष भराड आणि अभय शिंदे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या दोघांसह मुंबईचा जय खंडेलवाल, कोल्हापूर येथील प्रथमकुमार शिंदे व नागपूरच्या श्रुती जोशी यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या संघासोबत औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील तुकाराम म्हेत्रे यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. हे सर्व स्पर्धेसाठी जॉर्डन येथे रवाना झाले आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष व भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता, सचिव बशीर अहमद, कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, अंकुशराव कदम, मानसिंग पवार, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, दिनेश वंजारे, मच्छिंद्र राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.फोटो कॅप्शन : आशियाई तलवारबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेले खेळाडू. सोबत राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे.