औरंगाबाद : ‘सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो’ ही जुनी म्हण आहे. त्याची प्रचिती सराफा बाजारात साफसफाई करणाऱ्या झारीवाल्या महिलांना नेहमी येते. येथे जवळपास शंभर लहान-मोठ्या सोन्या-चांदीच्या दुकानात त्या सहा महिला मोफत झाडू मारतात. एवढेच नव्हे, तर झाडलेला कचरा टाकून न देता त्या सोबत घेऊन जातात. त्या कचऱ्यातून शोधून काढलेले सोने विकून त्या महिला आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत. हा त्यांचा पिढीजात धंदा आहे.
या महिलांना झारेकरी असे म्हटले जाते. या महिला सराफाच्या दुकानात झाडू मारतात. कचऱ्याची जमा झालेली माती एका एका लोखंडी घमेल्यात टाकतात. नंतर त्या मातीला पाण्याने धुतात. तेव्हा त्या महिलांच्या नजरेतून सोने जास्तवेळ मातीत लपून राहात नाही. झाऱ्यातून सोने शोधून काढतात म्हणून त्यांना झारेकरी असे म्हणतात.
उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक महिला दररोज १०० ते ७०० मि.ग्रॅ.पर्यंत सोने शोधून काढतातच. ते शुद्ध सोने नसते. सोनाराच्या दुकानात घडविलेल्या किंवा वितळविलेल्या दगिन्यांतील काही अंश मातीत पडतो. ते हे १८ ते २० कॅरेटचे सोने असते. १०० मि.ग्रॅ. सोन्याचे ३५० रुपये त्यांना मिळतात. असे महिन्याकाठी १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत त्या प्रत्येकजणी कमवतात.
चौकट
खानदानी झारीवाले
आम्ही शिकलेलो नाही. पण, खानदानी झारीवाले आहेत. मातीतून सोने शोधून काढणे सोपे काम नाही. पण, अनुभवातून हे कौशल्य प्राप्त केले आहे. या कामात कधी सोने मिळते, तर कधी नाही. मात्र, दिवाळीला हमखास ६ जणींना दररोज प्रत्येकी ७०० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक सोने मिळते.
- भीकाबाई कांबळे, झारेकरी
चौकट
झारेकरीचा प्रामाणिकपणा
झारेवाले सराफा बाजारातील सोनाराचे दुकान झाडून काढतात. ही परंपरा मागील दोन पिढ्यांपासून सुरू आहे. या महिला एवढ्या प्रामाणिक आहेत की, झाडून घेताना त्यांना सापडलेले सोने दुकानमालकाला देऊन टाकतात. दुकानातील फक्त कचऱ्याची माती सोबत नेतात.
- जुगलकिशोर वर्मा, सराफा व्यावसायिक
कॅप्शन
सराफा बाजारातील सोनाराच्या दुकानात व बाहेरील कचरा साफ करून घमेल्यात भरून घेताना झारेकरी महिला.