औरंगाबाद : सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत व त्यानंतरच लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
संपूर्ण लॉकडाऊनला सर्व स्तरांतून विरोध होत आहे. व्यापाऱ्यांनीही संपूर्ण लॉकडाऊनला पहिल्यापासूनच विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ४ वाजता जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, आधीच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यापाऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांना आपला व्यवसाय बंद करावा लागला होता. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढली होती.
मात्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्या काळात ४० टक्के व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण होत आहे. लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी द्यावी. त्यानंतरच लॉकडाऊन सुरू करावे. ज्यामुळे सर्व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल व दुकाने उघडी असल्याने ग्राहकही गर्दी करणार नाहीत.
अनेकांची मार्च एण्डची कामे बाकी आहेत. यात स्टॉक स्टेटमेंट तयार करणे, जीएसटीचे विवरणपत्र भरणे, आयकर रिटर्न भरणे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचासुद्धा भरणा करावयाची मुदत ३१ मार्च आहे. लाइट बिलाची मुदतसुद्धा ३१ मार्च आहे, याचा विचार प्रशासनाने करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. रविवारी रात्री पोलीस आयुक्तांसमवेत बैठक आहे. त्यात आम्ही या मागण्यांचा विचार करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी, पंकज लोया, दिलीप चोटलाणी यांची उपस्थिती होती.