औरंगाबाद : ती जात हलकी, आम्ही त्यांच्यापेक्षा वरचे किंवा श्रेष्ठ, अशी एकमेकांबद्दलची भावना सोडून देऊन इतर वंचितालाही सत्तेत पाठवायचे आहे व त्यालाही निवडून द्यायचे आहे, हे लक्षात ठेवून विधानसभा निवडणुकीत मतदान झाल्यास वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि आताचे जेवढे प्रश्न आहेत, ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आज येथे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला.
ते राधाकृष्ण मंगल कार्यालयात बंजारा समाज सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते. यानिमित्ताने मंगल कार्यालयाचे दोन्ही हॉल महाराष्ट्रभरातून आलेल्या बंजारा समाजबांधवांनी भरून गेले होते. बंजारा समाजाच्या विविध ३० संघटनांनी आज बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला व एकूण ४० जागांची मागणी केली. ज्या मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बंजारा समाजाची संख्या आहे, तेथे ही तिकिटे दिली जावीत, अशी मागणी यावेळी प्रा. पी.टी. चव्हाण यांनी केली. हल्ली जो उठतो तो बाळासाहेबांना भेटतो आणि तिकिटाची मागणी करतो. तिकिटे देताना शहानिशा केली जावी आणि गोर बंजारा समन्वय समितीची शिफारस ग्राह्य धरावी, असे आजच प्रा. पी.टी. चव्हाण व राजपालसिंग राठोड यांनी सांगून ठेवले, तर माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याबरोबर, औरंगाबाद मध्यमधून बौद्ध उमेदवारास तिकीट दिले जावे, अशी मागणी केली.
नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिरा मेळावा सुरू झाला. तोपर्यंत नरेंद्र राठोड व संचाने क्रांतिकारी गीते गाऊन उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. सूत्रसंचालक अंबरसिंग चव्हाण यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. एकाच मोठ्या हारात मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बाळासाहेब व खा. इम्तियाज जलील यांचे स्वागत ‘बंजारा लेणे’ देऊन करण्यात आले. दोघांनीही हे लेणे शेवटपर्यंत काढले नाही. प्रल्हाद राठोड, सौ. बनकर, शारदा चव्हाण, तुषार राठोड, सुनील चव्हाण, चुनीलाल जाधव, अनिल चव्हाण, मोतीलाल चव्हाण, डॉ. कृष्णा राठोड, मनोहर चव्हाण, आयेशा आत्माराम राठोड, महेश तांबे, अतिश रामराव राठोड, सुमित चव्हाण, अरविंद चव्हाण, दिनेश राठोड, नरेंद्र राठोड आदींना संविधानाची प्रत देऊन आंबेडकर यांनी ‘वंचित’मध्ये प्रवेश दिला. ‘मी कोण... मी कोण, बाळासाहेब बाळासाहेब’ अशा घोषणा यावेळी निनादत होत्या.प्राचार्य ग.ह. राठोड यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रतिभावंत’ या गौरव अंकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते करण्यात आला.
बंद करो ये प्रवेश...यावेळी बोलताना खा. इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सल्ला दिला की, अब ये प्रवेश बंद करो. क्योंकि अब पुरा महाराष्ट्रही आपके साथ आ गया है. (टाळ्या) मेळाव्यात जलील हे उशिरा आले आणि लोकसभा अधिवेशनाला जायचं आहे, म्हणून भाषण करून निघूनही गेले. ते मंचावर आले आणि त्यांना जागा देण्यासाठी एक-एक जण खुर्ची रिकामा करूलागला. बाळासाहेबांच्या शेजारी बसलेले राजपालसिंग राठोडही उठत होते; पण बाळासाहेबांना राजपालसिंग यांना उठू नका, असा इशारा केला आणि राजपालसिंगांच्या बाजूला जलील यांना बसावे लागले.