लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सीएची अंतिम परीक्षा देत असताना शेवटचे तीन महिने माझा मोबाईल ‘स्विच आॅफ’ करून कपाटात ठेवला होता. अभ्यासात एकाग्रता मिळविण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही. झपाटून अभ्यास केला व सीए परीक्षा उत्तीर्ण झाले. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी संयम व झपाटून अभ्यास करावा लागेल, असा सल्ला सीए व अभिनेत्री अर्शीन मेहता हिने विद्यार्थ्यांना दिला.इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडिया (आयसीएआय) च्या अंतर्गत सीए विद्यार्थी संघटनेच्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेची रविवारी सायंकाळी उत्साहात सांगता झाली. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृह सीए विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भरून गेले होते. सीए होऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणारी अभिनेत्री अर्शीन मेहता सर्वांचे आकर्षण ठरली होती. तिच्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. टाळ्यांच्या कडकडाटात तिचे रंगमंचावर आगमन झाले. सीएचे सर्वोत्तम करिअर सोडून थेट बॉलिवूडमध्ये अभिनेत्री का झाली, हाच सर्वांच्या मनातील किंतू हेरून सूत्रसंचालन करणारे गौरव सिपानी व समीक्षा शर्मा यांनी तिला प्रश्न विचारला. तेव्हा अर्शीन म्हणाली की, मला मिस इंडियाही बनायचे होते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपट बघितला आणि मनात नक्की केले की, आपण बॉलिवूडमध्ये करिअर करायचे. पण नंतर आई-वडिलांच्या आग्रहामुळे मी सीए कोर्समध्ये प्रवेश घेतला. पण मी कशाला एवढा अवघड अभ्यास करते. मला तर अभिनेत्री व्हायचेय. अभिनेत्री तर अभ्यासही करीत नाही. असे अनेकदा मनात प्रश्न आले. नंतर मनात ठरविले सीए परीक्षा उत्तीर्ण व्हायचे. ध्येय गाठले. सीए झाले. आई-वडिलांचे स्वप्नपूर्ण केले. मग करिअरचा ‘ए’प्लॅन अभिनेत्री व ‘बी’ प्लॅन सीए हा ठरविला. तेव्हा ‘लोग क्या कहेंगे’ याचा विचार केलानाही.जाहिरात क्षेत्र व चित्रपटात मला काम मिळाले व आता दाक्षिणात्य चित्रपटातही काम करीत आहे. बॉलिवूडमध्ये सीए म्हटले की, मला आदरपूर्वक बघतात, सन्मानपूर्वक वागणूक देतात. हेच सीए होऊन मी कमावले, असेही तिने सांगितले. ही चर्चा चांगलीच रंगली होती. तत्पूर्वी सीए सुश्रुत चितळे, राधिका झंवर यांनी मार्गदर्शन केले. परिषद यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.परिषद यशस्वीतेसाठी सीए संघटनेचे सीए उमेश शर्मा, अध्यक्ष सचिन लाठी, माजी अध्यक्ष अल्केश रावका, विद्यार्थी संघटना अध्यक्ष पंकज सोनी, योगेश अग्रवाल, निखिल ग्रामले, रवी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
अभ्यासात एकाग्रतेसाठी मोबाईल बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:00 AM