बाळासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सातवाहनकालीन तेराकोट मुद्रा, रोमन तेराकोट मुद्रा, आकर्षक कलाकृतीचे दगडी साचे, सातवाहनकालीन टाकसाळीतील नाण्याचे खापरी साचे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हस्ताक्षर, जकात गोळा करण्याचा रांजण, यादवकालीन खापराची भांडी यांचा संग्रह केला. हा संग्रह त्यांच्या वाड्यातून १६ जून १९९७ रोजी ज्ञानेश्वर उद्यानातील त्यांच्या नावाने सुरू झालेल्या वस्तू संग्रहालयात वर्ग करण्यात आला. मात्र जागेअभावी तब्बल ९ हजार वस्तू अद्यापही कुलूपबंदच पडून आहेत. बाळासाहेबांनी ज्या उद्देशाने ऐतिहासिक ठेवा शासनाच्या हवाली केला होता, तो उद्देश दोन तपांनंतरही पूर्ण न झाल्याने इतिहासप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
------
एक कोटीचा निधी मंजूर, तरी मुहूर्त नाहीच
संग्रहालयाची प्रदर्शन व्यवस्था निस्तेज झाली आहे. वूडन स्ट्रॅक्चरल वर्कास वाळवी लागली आहे. या संग्रहालयात नव्या शास्त्रीय पद्धतीने प्रदर्शन लावले जावे. सोबतच बाह्य विकासाची कामे व्हावीत, या दृष्टीने तत्कालीन संग्रहालय प्रमुख तथा अभिरक्षक डॉ. मधुकर कठाणे, तंत्रसहायक अमोल गोटे यांनी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाकडे १ कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर केला होता. यात उद्यानासाठी स्वतंत्र रस्ता बांधणे, संरक्षक कठडे, परिसर सुशोभीकरण करणे, प्रदर्शन व्यवस्था नूतनीकरण या कामांचा समावेश आहे. पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाने एक कोटीचा हा प्रस्ताव मंजूर करून आता दोन वर्षे पूर्ण होत आहे. अद्याप कामास मुहूर्त मात्र लागेना.
----
पुरातत्त्व विभागाचा पत्रव्यवहार
संत ज्ञानेश्वर उद्यानात संग्रहालयासाठी दिलेल्या इमारतीचा उर्वरित भाग ताब्यात घेण्यासाठी पुरातत्त्व खात्याचा जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. जलसंपदा विभागाने अद्याप या पत्रव्यवहारास प्रतिसाद दिलेला नाही.