छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यात २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या राड्यानंतर केंद्र व राज्यशासनातील मंत्री आणि सनदी अधिकार्यांनी शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. गुरूवारी दुपारी किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये आ.प्रदीप जैस्वाल, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, ठाकरे गटाचे माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, संजय खंबायते, लक्ष्मीकांत थेटे आदींची उपस्थिती होती.
संयम व शांतता ठेवाकिराडपुऱ्यात राडा करून जनभावनांमध्ये तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई होईलच. ज्यांनी हे घडवून आणले ते सुटणार नाहीत. नागरिकांनी संयम व शांतता ठेवावी.- डॉ.भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
दोषींवर कारवाई होणारकिराडपुर्यातील घटनेमागे जे आरोपी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. उत्सवांना गालबोट न लागता शांततेत सर्व कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन आहे.-संदिपान भूमरे, पालकमंत्री
अफवांवर विश्वास ठेऊ नकाराम मंदिर परिसरात काहीही नुकसान झालेले नाही. घटनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सर्व जनतेने शांततेने व संयमाने यापुढील सण साजरा करावेत.-अतुल सावे, सहकार मंत्री
शांतता राखावीघटनास्थळी पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेला कुमक वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. शासनाला देखील याबाबतची माहिती दिली असून सर्वांना शांतता राखावी.-सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त
शासना माहिती दिलीमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यसचिवांना घटनेची माहिती दिली आहे. समाज कंटकांवर कारवाई होईलच. यापुढील उत्सव नागरिकांनी आनंदाने साजरा करावेत.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी
उच्चस्तरीय चौकशी व्हावीया घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई झालीच पाहीजे. नागरिकांनी शांतता बाळगावी. पोलिस घटनास्थळी उशीरा का आले हे तपासले पाहिजे.- इम्तियाझ जलील, खासदार
घटनेमागे एमआयएम, भाजपकिराडपुर्यातील घटनेमागे एमआयएम आणि भाजप जबाबदार आहे. नागरिकांनी संयम व शांतता पाळावी. घटनेची चौकशी करून समाजकंटकांवर कठाेर करावाई व्हावी.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते