छत्रपती संभाजीनगर : पत्ते खेळताना जुन्या वादातून खून केल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या हुसेन खान इब्राहिम खान (संजयनगर, बायजीपुरा) याने मित्राकरवी मुलाला पिस्तूल बाळगण्याचा सल्ला पोहोचवला. गुन्हे शाखेला जिन्सीत असे पिस्तूल घेऊन तरुण फिरत असल्याचे कळताच त्यांनी हुसेनचा मुलगा आमेरला (२१) मंगळवारी सापळा रचून अटक केली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांना जिन्सीत काही महिन्यांपासून एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. बोडखे, सहायक फौजदार सतीश जाधव यांनी मंगळवारी पथकासह कैसर कॉलनीत सकाळी सापळा रचला. घरासमोर उभ्या आमेरला पोलिस आल्याचा संशय येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमलदार संदीप तायडे, राहुल खरात, काकासाहेब आधाने, तात्याराव शिनगारे, अनिता त्रिभुवन यांनी पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा त्याच्या कंबरेलाच पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे आढळली.
वडिलांचा निरोप, बीडवरून खरेदी केले पिस्तूलआमेरचे वडील हुसेनने २०१९ मध्ये पत्ते खेळताना एकाची हत्या केली होती. त्यात जिन्सी पोलिसांच्या तपासानंतर आरोप सिध्द झाल्याने त्याला नुकतेच जन्मठेपेची शिक्षा लागली. हत्या केल्याने त्याचा बदला म्हणून मुलाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्याला व आमेर दोघांना होती. कारागृहात भेटायला गेलेल्या मित्राकडून वडिलाने पिस्तूल नियमित बाळगण्यास सांगितल्याचा निरोप मिळाला होता. त्यानुसार ७ महिन्यांपूर्वी मी बीडमधून ५० हजारांत पिस्तूल खरेदी केल्याची कबुली आमेरने दिली. परंतु, यात आमेरचा वेगळा उद्देश आहे का, याचाही जिन्सी पोलिस तपास करत आहेत.