औरंगाबाद : युवासेनेच्या मराठवाडा पदाधिकारी संवाद मेळाव्यात शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाचा अनुभव आला. युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ आणि कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची घोषणाबाजी चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, गर्दीमुळे कोरोना संसर्ग (Corona Virus ) नियमांचे उल्लंघन झाल्याने याबाबत अहवाल घेऊन कारवाईचा निर्णय होईल, असे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
शहानूरमियाँ दर्गा येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे शुक्रवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी आसनव्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, अशी करण्यात आली होती. परंतु, पॅव्हेलियनच्या बाहेर आमदारपुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. ‘ऋषिकेश अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यातच मेळाव्या ठिकाणी जैस्वाल यांनी क्रेनवर मोठे होर्डिंग्ज लावले होते. शहरातील इतर ठिकाणच्या होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी तेथे होर्डिंग्ज लावल्याची चर्चा होती. दरम्यान, सरदेसाई मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येताच जंजाळ यांंनी त्यांना व्यासपीठाकडे नेले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा गराडा सरदेसाई यांना घातला. तोपर्यंत जैस्वाल व त्यांचे समर्थक पॅव्हेलियनच्या बाहेरच होते.
जंजाळ व इतर पुढे गेल्यानंतर घोषणाबाजी करीत जैस्वाल व त्यांच्या समर्थकांनी आत प्रवेश केला. तेथे एकच गर्दी झाली. सोशल, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले गेले नाही. बीडमध्ये जास्त गर्दी करायला नको होती, त्यातून बोध घेतला असून, औरंगाबादच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलाविल्याचे सरदेसाई यांनी सकाळी सांगितले होते. मात्र, सायंकाळी त्यांना गर्दीचा सामना करावाच लागला. दरम्यान, मेळाव्याला सरदेसाई यांच्यासह रोहयो मंत्री संदीपान भूमरे ( Sandipan Bhumare ) , माजी खा. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी नंदकुमार घोडले, त्र्यंबक तुपे, आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक जंजाळ यांनी केले. ऋषिकेश खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.
खैरेंमुळे जिल्ह्याची वाताहत तर जलील यांचे काम उत्तम ; भाजपच्या आमदाराकडून एमआयएम खासदारांचे कौतुक
आ. शिरसाट, आ. दानवे, सरदेसाई काय म्हणालेआ. शिरसाट म्हणाले, जिल्हाप्रमुख आ. दानवे यांच्यापेक्षा जंजाळ यांचे छायाचित्र सध्या माध्यमांतून वारंवार दिसते आहे. त्यांचा हा टोला मेळाव्यास्थळी चर्चेत होता. दर दोन महिन्यांनी युवासेनेचे मेळावे घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, युवासेनेत शिकलेले, सुशिक्षित तरुण आले पाहिजेत. जेणेकरून चांगले संघटन होईल. ११५ वॉर्डांमध्ये युवासेनेचे चांगले संघटन झाले पाहिजे. दानवे यांच्या सूचनेचा धागा पकडून सरदेसाई यांनी जंजाळ, खैर यांच्यावर निशाणा साधला. ८ ते १० वर्षांपासून युवासेनेचे काम पाहत आहात. आता ११५ वॉर्डांत संघटनासाठी संवाद दौरा आयोजित करा. मुंबई, ठाण्यात चांगले संघटन होऊ शकते, मग येथेही संघटना चांगल्या पद्धतीने वाढविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फर्स्ट व्होटरची पहिली पसंती युवासेनाच असावी, ते म्हणाले.