- सुधीर महाजन
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी उघड पंगा घेणारे भाजपचे औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केणेकर सध्या कोंडीत अडकलेले दिसतात आणि त्यांची ही कोंडी केली आहे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी.
होणार होणार म्हणून गाजत असलेली कार्यकारिणीची यादी जाहीर झाली; पण ती केली जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खा. डॉ. भागवत कराड यांनी. भाजपने बोलावलेल्या पत्रपरिषदेला स्वत: केणेकरच हजर नव्हते. जिल्हा आणि शहर अशा दोन्ही कार्यकारिणी त्यांनीच जाहीर केल्या; पण त्यापूर्वीच भाजपच्या प्रसिद्धी विभागाने त्या पत्रकारांकडे पाठवल्या होत्या. केणेकर का गैरहजर राहिले, याचे उत्तर मिळत नव्हते. शिस्तीचे सुनियोजित दर्शन असणाऱ्या भाजपच्या या पत्रपरिषदेत गोंधळाचे गोंधळेपण होते.
शहरातील दोन विधानसभा तसेच एक लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाची ९ मंडळे आहेत आणि कार्यकारिणीत या सर्वच मंडळांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे; पण सातारा, पदमपुरा-छावणी या दोन मंडळांना कार्यकारिणीत प्रतिनिधित्व नाही. खासदार, आमदारांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावल्यामुळे केणेकर अस्वस्थ झाले. सगळ्याच नेत्यांनी आपल्या समर्थकांच्या याद्या त्यांच्या हातात देत सगळ्यांनाच द्या, असा वडीलकीचा आदेश दिला. त्यामुळे केणेकर कार्यकारिणीला नवा चेहरा देऊ शकले नाही.
कार्यकारिणी जाहीर होताच या शिस्तबद्ध पक्षात बहुजन विरुद्ध प्रस्थापित, असा वाद उफळला आणि कार्यकारितील लोकांनी महापालिका निवडून दाखवावे, असे आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले. महिला इच्छुकांच्या प्रतिक्रिया तर बोचऱ्या होत्या. नव्या नव्या फॅशनेबल पर्स घेऊन मिरवणाऱ्यांची वर्णी लावली. असा संताप व्यक्त होताना दिसला. एका अर्थाने पक्षातील असंतोषाची खदखद उघड झाली. आता नेत्यांनी वर्णी लावलेल्या कार्यकारिणीला घेऊन केणेकरांना महापालिका निवडणुकीचे शिवधनुष्य पेलायचे आहे.