केरळचा औषधी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:18 AM2018-08-19T00:18:26+5:302018-08-19T00:19:32+5:30

केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही.

Kerala's medicinal supply jam | केरळचा औषधी पुरवठा ठप्प

केरळचा औषधी पुरवठा ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज जाणारे ३० ट्रक थांबले : टायर, ट्यूबसाठी लागणारे रबर, मसाल्याची आवक घटली

प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. तसेच कंडोम व टायर, ट्यूब बनविण्यासाठी लागणारे रबर आणि मसाल्याच्या आवकवरही परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळल्याचा परिणाम येथील औद्योगिक वसाहतीलाही जाणवू लागला आहे. येथील औषधी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. औरंगाबादमध्ये औषधींच्या ५ ते ७ मोठ्या कंपन्या आहेत. तर ५० ते ७० च्या आसपास मध्यम व लहान प्रकारातील औषध निर्मिती युनिट आहेत. औषधी उत्पादक उद्योजक कमांडर अनिल सावे यांनी सांगितले की, वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची मिळून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळ राज्यात जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळकडे रवाना झाली नाही. याचा आर्थिक फटका औषधी कंपन्यांना बसत आहे. ही औषधी दुसऱ्या राज्यांकडे वळविण्यात येत आहे. जे. के. अ‍ॅन्सेल कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. डी. भूमकर यांनी सांगितले की, केरळ, कर्नाटक व तामिळनाडूमधून रबर येथे येते. त्यातील ८० टक्के रबरची निर्मिती एकट्या केरळात होते. महिनाभरात सुमारे १५ ट्रक लॅटेक्स रबर येथील औद्योेगिक वसाहतीत मागविले जाते. केरळमधून रबर येत नसले तरी कर्नाटक व तामिळनाडूचा पर्याय आहे. पण केरळच्या परिस्थितीचा रबरच्या आवकवर परिणाम निश्चित जाणवेल. टायर व ट्यूब बनविण्यासाठीही केरळ राज्यातून रबर मोठ्या प्रमाणात शहरात आणले जाते. कंपनीतील एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार महिनभरात १०० टनपेक्षा अधिक रबर केरळातून येत असते. टायर मोल्डिंगसाठीही या रबराचाच वापर होतो. माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, औषधी व इतर उत्पादने घेऊन येथून दररोज ७० ते ८० ट्रक केरळला जात असतात. मात्र, अतिवृष्टीमुळे एकही ट्रक केरळात गेला नाही.
इलायची, काळीमिरी, जायफळ, सुंठ, सुपारी महागली
इलायची, काळीमिरी, जायफळ, गोटा खोबरा, सुपारी उत्पादनात केरळ राज्य अग्रेसर आहे. यासंदर्भात मसाल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले की, इलायचीचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीने आवक थांबली असून, तेथील उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, ५०० रुपयांनी इलायची महागली असून शुक्रवारी १५५० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. ३० ते ४० रुपयांनी काळीमिरीचे भाव वाढून ५५० ते ७०० रुपये किलो झाले.
जायपत्री १०० रुपयांनी वधारून १२०० ते १६०० रुपये किलो, सुंठमध्ये ४० रुपये वाढून २४० ते ३०० रुपये किलो तर किलोमागे १० ते २० रुपये वाढून सुपारी ३०० ते ३६० रुपयांना विकत आहे. खोबरा गोटा कर्नाटक, तामिळनाडूतूनही येत असल्याने खोबºयात भाववाढ झाली नाही. तसेच २० ते ३० टक्के चहापत्तीही केरळातून येते, पण आसाममधूनही चहापत्ती येत असल्याने परिणाम नाही.

Web Title: Kerala's medicinal supply jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.