औरंगाबाद : मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. त्यामुळे या शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचा पुरवठा करावा लागणार आहे. काळ्याबाजारात रॉकेलची विक्री होत असल्यामुळे पुरवठा विभागाने हळूहळू कोटा कमी करण्याकडे भर दिला असून, हमीपत्रामुळे काळाबाजारातील रॉकेल विक्रीला आळा बसणार का? असा प्रश्न पुढे येत आहे.
मराठवाड्यात १७ लाख ८९ हजार ९१० रॉकेल घेणारे कार्डधारक आहेत. प्रत्येक कार्डधारकाला चार लिटर रॉकेल मिळते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात ७ हजार १७६ केएल (७१ लाख ७६ हजार लिटर) रॉकेलची आवश्यकता होती. शासनाने रॉकेल घेण्यासाठी हमीपत्राचा नियम लागू केल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ८२४ तर नोव्हेंबरमध्ये ४ हजार ४२८ केएल अशी नियतनात घसरण झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे.
दुसरीकडे हमीपत्रामुळे रॉकेलच्या कोट्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हमीपत्राच्या नावाखाली रॉकेलचा काळाबाजार वाढण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. रेशनिंग दुकानांतून धान्यासह रॉकेल वाटप करण्यात येते. मात्र शासनाने गॅस सिलिंडर वापरण्यावर अधिक भर दिल्याने रॉकेलचा कोटा कमी करण्याकडे भर दिला आहे.
गॅस जोडणी नसलेले नागरिकजिल्हा हमीपत्र देणारे कार्डधारक औरंगाबाद २,५८,४०९जालना १,४८,८७२परभणी १,०४,५३९हिंगोली १,६२,६५४नांदेड १,७५,७१६बीड २,००,३९४लातूर १,३५,५१०उस्मानाबाद ५५,६४०एकूण १२,४१,५५४