औरंगाबाद : काँग्रेस आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीचा ‘सदुपयोग’यंदा मनपाने केला. पंधरा दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा करून कंत्राटदाराने काम थांबविले. अजूनही तलावात ९० टक्के गाळ जशास तसा आहे. २ कोटी रुपये पंधरा दिवसांमध्ये कसे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात खाबूगिरी झाल्याचे बोलले जात आहे.मागील ५० वर्षांमध्ये हर्सूल तलावातील गाळ कधीच काढण्यात आला नव्हता. तलावात गाळाचे प्रमाण बरेच वाढल्याने दिवसेंदिवस पाणी कमी साचत आहे. चार वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हर्सूल तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारने २ कोटी रुपयांचा निधी मनपाला गाळ काढण्यासाठी दिला. मागील वर्षी ऐन पावसाळ्यात गाळ काढण्याचे टेंडर मनपाने काढले होते. या टेंडरला नगरसेवकांकडून कडाडून विरोध झाल्याने मनपाने उन्हाळ्यात काम करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. यंदाही मनपाला गाळ काढण्याची अजिबात इच्छा नव्हती. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी हर्सूल तलावाची पाहणी करून गाळ काढण्याचे आदेश दिल्यावर मनपाची यंत्रणा कामाला लागली. ज्या कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले होते, त्याने मागील १५ दिवसांमध्ये सुमारे ४५ हजार क्युबिक मीटर गाळ काढल्याचा दावा केला. २ कोटी रुपयांमध्ये एवढेच काम होऊ शकते. आणखी गाळ काढण्यासाठी निधी पाहिजे, अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे. मनपाने कोणत्या ‘हिशोबाने’कंत्राटदाराला गाळ काढण्याचे काम दिले. गाळ काढण्याच्या कामात कंत्राटदाराचे हित का जोपासण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
तलावातील गाळ उपसण्यातही खाबूगिरी
By admin | Published: May 21, 2016 12:01 AM