लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वातंत्र्याच्या लढ्याची प्रेरणास्थान बनलेल्या खादीला आता पुन्हा ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा ४० टक्क्याने खादीची विक्री वाढली आहे. विशेषत: गडद रंगातील खादीचा कुर्ता व पांढरा पायजमा, तसेच लिनन खादी सर्वाधिक पसंत केली जात आहे.खादी म्हटले की, आपल्यासमोर जाडाभरडा कपडा डोळ्यासमोर येतो. बदलत्या काळानुसार खादीनेही आपल्या रंगात व रूपात बदल घडवून आणला आहे. आता मुलायम व आकर्षक रंग खादीला मिळाला आहे, म्हणून युवावर्गात खादीची क्रेझ निर्माण झाली आहे. सर्वप्रथम खादीचे जॅकीट बाजारात आले आणि हे जॅकीट लोकप्रिय झाले. यंदा गडद रंगातील कुर्ता अधिक पसंत केला जात आहे. या कुर्तामध्ये डिझायनर कुर्तेही बाजारात आले आहेत. कोणत्याही रंगातील कुर्ता घेतला तरी खाली पायजमा हा पांढरा रंगातीलच खरेदी केला जातो.विक्रेते अनिकेत तांदळे यांनी सांगितले की, खास लक्ष्मीपूजनासाठी खादीचा कुर्ता व पायजमा खरेदी केला जात आहे. पूर्वी खादी फक्त विविध पक्षाचे नेते खरेदी करीत असत; पण आता महाविद्यालयीन तरुणही खादी आवडीने खरेदी करीत आहेत. हा मोठा बदल पाहण्यास मिळत आहे. खादी ग्रामोद्योग भंडारचे व्यवस्थापक धर्मराज राऊत यांनी सांगितले की, लिनन खादी हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्क्याने खादीची विक्री वाढली आहे. गांधी जयंतीला एकाच दिवशी ६ लाख रुपयांची खादी विक्री झाली होती. हा आजपर्यंतचा विक्रमच ठरला आहे.
युवांमध्ये खादीची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:09 AM