लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.
एका पत्रकार परिषदेत कराड यांनी खैरे यांच्या तीन दशकांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. चिकलठाणा, एमआयडीसी वाळूज या भागात एकही मोठी कंपनी त्यांना आणता आली नाही. मग बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल? जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागलेली आहे. रस्ते गुळगुळीत व्हावेत असे त्यांना अजिबात वाटत नाही. पक्षातील दोन नेत्यांमध्ये भांडणे लावून देणे. निवडणुका आल्यावर संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित करणे, हा एकमेवर उद्योग ते करीत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच युतीच्या बाजूने निर्णय घेतले. अलीकडे खैरे यांनी अत्यंत दळभद्री युती सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युती केली. फुलंब्रीत काँग्रेस-राष्टÑवादीसोबत युती केली. फुलंब्रीत, तर भगवा रुमालही त्यांनी गळ्यातून काढून बाजूला ठेवला. त्यांच्या या ढोंगीपणाचे उत्तर मतदारांनी दिले. तीन वर्षांपूर्वी अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. मग आजपर्यंत पुतळा का उभारला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवालही कराड यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी महापौर बापू घडमोडे, संजय खंबायते, जालिंदर शेंडगे, व्यंकटेश कमळू, मोहनराव आहेर, राम बुधवंत उपस्थित होते.
चव्हाण यांनी राष्टवादीची वाताहत थांबवावीभाजप हा राष्ट्रीय पातळीवरील एक मोठा पक्ष आहे. या पक्षात लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची अक्षरश: फौज उभी आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजप औरंगाबाद जिल्ह्यात लढविणार म्हणजे लढविणारच, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. भाजप उमेदवार आयात करणार असे विधान राष्टवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी केले होते. राष्टवादीने अगोदर आपल्या पक्षाची वाताहत थांबवावी. राष्टवादीचे देशात फक्त चार खासदार, राज्यात केवळ ४० आमदार, जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे जि.प. सदस्य आहेत. नगराध्यक्ष तर नाहीत. दुस-याच्या पक्षात डोक्यावण्यापेक्षा स्वत: संघटन मजबूत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शरद पवार यांच्यानंतर पक्षाची काय अवस्था होईल, याचाही विचार चव्हाण यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.
पक्षाने उमेदवारी दिली तर...खैरे यांच्यावर राजकीय तोफ डागण्यामागचे कारण काय? या थेट प्रश्नावर कराड यांनी मी पण एक इच्छुक उमेदवार असल्याचे नमूद केले. पक्षाकडे आतापर्यंत आठ ते दहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच पक्षाचे निरीक्षकही शहरात आले होते. त्यांनी आढावा घेऊन कामाला लागा, असा आदेश दिल्याचे कराड यांनी सांगितले.