लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्ट्रवादी काँगे्रसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी शिवसेनेचे विद्यमान खा. चंद्रकांत खैरे यांना पुन्हा लोकसभेत एन्ट्री अशक्य असल्याचे केलेल्या वक्तव्याला खा.खैरे यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. चव्हाणांचा बार फुसका निघणार असल्याचे सांगून त्यांनी एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्रित लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा विश्वास व्यक्त केला.शेंद्रा येथे इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खा. खैर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना आ.चव्हाण यांनी दिलेल्या आव्हानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चव्हाणांचा बार फुसका असल्याचे सांगितले. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दिशा समितीच्या बैठकीतही त्यांनी याचप्रकारे प्रतिक्रिया दिली.लोकसभा निवडणुकीला १७ महिन्यांचा कालावधी आजपासून बाकी असला तरी राजकीय आतषबाजीच्या चर्चेचा बार यावर्षीच्या दिवाळीलाच फुटला आहे. भाजपला नांदेड, गुरुदासपूरमध्ये बसलेला फटका पाहता भाजप एनडीएतील घटक पक्षांना यापुढे दुखावणार नाही, असे खैरेंना वाटते आहे. त्यामुळे सेना-भाजप युती होणार असल्यामुळे भाजपचा उमेदवार नसेल, असा पोकळ आशावाद खैरेंना वाटतो आहे.दरम्यान, भाजपला औरंगाबाद लोकसभा मतदासंघ पूर्ण ताकदीनिशी ताब्यात घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवून भाजपची तयारी सुरू आहे. याबाबतचा मतदारसंघाचा पूर्ण लेखाजोखा पक्षाकडे आहे. भाजपचे लोकसभा मतदारसंघ निरीक्षक महेंद्रसिंग यांनी ५ आॅक्टोबर रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात चाचपणी करणारी दीड तास बैठकही त्यासाठीच घेतली. त्यानंतर पुन्हा कोअर कमिटीची एक बैठक झाली. असे असताना खैरेंना लोकसभा निवडणुकीत युती होण्याचा विश्वास वाटतो आहे.
चव्हाणांचा बार फुसका निघणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:48 AM