औरंगाबाद : शहरात पाच महिन्यांपासून साचलेला कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्यालगतच्या गायरान जमिनीत टाकण्यास रविवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाल्यानंतर दुपारी ३ वाजता मनपाने कचऱ्याने भरलेली वाहने शहरातच उभी करून ठेवली. या सगळ्या प्रकारामागे खा.चंद्रकांत यांच्या दबावाचे राजकारण असल्याचा आरोप आ.हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
खैरे जिल्ह्याचे नेते असताना त्यांना एक गायरान जमीन शोधून तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. मी ५० कि़मी. लांबवरून शहरातील कचरा नेण्यास तयार असताना पालिकेवर दबाव आणून कचऱ्याची वाहने शहरातच रोखली जातात. हा सगळा प्रकार राजकीय श्रेयासाठी सुरू असल्याचेही जाधव म्हणाले. आ.जाधव म्हणाले, सकाळी २५ ट्रक रिकामे झाले, तेव्हा कुणीही विरोध केला नाही; परंतु कन्नड शिवसेना तालुकाप्रमुखाने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाही, असे माध्यम प्रतिनिधींकडून समजले. शिवसेनेची कचऱ्यामुळे कोंडी झालेली असताना खैरे गटाचे कन्नड शिवसेना पदाधिकारी आड येणे योग्य नाही. खैरेंना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारण जवळचे वाटू लागले आहे.
शहरात रोगराईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी आताही शहरातील कचरा नेण्यास तयार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी माझी राहील. महापौर नंदुकमार घोडेले यांनी तर माझ्या निर्णयाचे स्वागत केले; परंतु त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना झापले. सद्य:स्थितीमध्ये खा.खैरेंनी मनपावर दबाव आणला असेल असे वाटत आहे. कारण मनपाचे अधिकारी माझा फोनही घेत नाहीत. मनपावर राजकीय दबाव आणल्याचे स्पष्ट झाले. कचऱ्यामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून, राजकारणापेक्षा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. नागरिक कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मॉर्निंग वॉकलादेखील जात नाहीत. माझा मुलगा आजारी पडला आहे, शहरातील अनेकांची मुले आजारी पडली असतील.
मी खैरेंना आव्हान देतोमाझे खा. खैरे यांना स्पष्ट आव्हान आहे. त्यांनी शहर कचरामुक्त करून दाखवावे. कचऱ्याच्या वाहनांना खा.खैरे यांनी संरक्षण द्यावे आणि गायरान जमिनीवर कचरा टाकून दाखवावा. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांनी ठरविले तर एका तासात कचऱ्यासाठी जमीन मिळेल. पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असताना प्रशासकीय यंत्रणेकडून एक गायरान जमीन कचऱ्यासाठी उपलब्ध होत नाही, कुणालाही कचऱ्याचा प्रश्न सुटावा, असे वाटत नाही. असा आरोप जाधव यांनी केला. पालिकेला कचरा वाहतुकीसाठी इंधनाचा खर्चदेखील देण्यास मी तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
पक्षप्रमुखांकडून शाबासकीचा दावापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाबासकी दिल्याचा दावा आ.जाधव यांनी केला. व्हॉटस्अॅपवर त्यांना एसएमएस दिल्यानंतर त्यांनी शाबास म्हणून एसएमएस पाठविल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी एसएमएस दाखविण्याची मागणी केली असता त्यांनी एसएमएस दाखविला नाही.
ह्युमजिकल आहे; कन्नडमध्ये जाऊन सरळ करीलआ. हर्षवर्धन जाधव ह्युमजिकल आहे, कन्नडमध्ये जाऊन त्यांना सरळ करील. गटबाजीच्या राजकारणाला तेच खतपाणी घालीत आहेत. महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी कचरामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर हे जागा मिळण्यात आडकाठी आणत आहेत. मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायकदेखील काहीही करीत नाहीत, असा आरोप करीत या सगळ्या प्रकारामागे शिवसेनाला बदनाम करण्याचा भाजपचा डाव असून, त्यांच्यासोबत आ.जाधव मिळाल्याचे प्रत्युत्तर खा.चंद्रकांत खैरे यांनी दिले. आ.जाधव यांच्यासह त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची ताकद मी ठेवून आहे. होर्डिंग्ज काढण्यासाठी तिन्ही सनदी अधिकारी एकत्र येतात, मग कचऱ्यासाठी जमीन मिळावी, यासाठी का एकत्र येत नाहीत, असा सवालही खा.खैरे यांनी केला.