औरंगाबाद : खा.चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर डीपी प्लॅनमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करताच भाजपचे पीत्त खवळले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या लाटेवरच लोकसभेत ते निवडून आले आहेत, याचा विसर त्यांना पडला आहे. आता लोकसभा निवडणुका घेतल्या तर त्यांना त्यांचे स्थान कळेल, असेही भाजपने खैरेंना निशाणा करीत शिवसेनेला ठणकावून सांगितले. बुधवारी खा.खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विकास आराखड्यातील घोळाप्रकरणी उपमहापौर राठोड यांना टीकेचे लक्ष्य केले होते. तसेच मोदी लाटेमुळे फायदा झाला; परंतु फक्त १० टक्के मते मोदी लाटेमुळे वाढल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यावर गुरुवारी भाजपने त्यांच्या टीकेला सडतोड उत्तर दिले. गुरुवारी उपमहापौर प्रमोद राठोड, गटनेते भगवान घडामोडे यांनी खैरेंनीच शहराच्या विकासाला खीळ बसविल्याचा आरोप करून आजवर खासदार निधीतून कोणकोणती कामे केली व निधी कुठे कुठे खर्च केला याची माहिती देण्याचे आव्हानदेखील दिले. यावेळी सभापती दिलीप थोरात यांची उपस्थिती होती. उपमहापौर राठोड व त्यांच्या निकटवर्तीयांनी विकास आराखड्यात जमिनींचे घोटाळे केल्याच्या खा.खैरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राठोड म्हणाले, खैरेंनी माझ्या विरोधात पुरावे सादर करावेत. मी जर दोषी असेल तर उपमहापौरपदाचा तातडीने राजीनामा देतो आणि जर त्यांचे आरोप प्रतिमा मलीन करण्यापुरतेच असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा राठोड यांनी दिला. पराभवामुळे तोल जात आहे...सातारा-देवळाईत शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. चार ‘टर्म’ पासून ते खासदार आहेत. असे असतानाही सातारा-देवळाईतील तांड्यांपर्यंत साधा रस्तादेखील ते विकास निधीतून करू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सेनेला दूर ठेवले, असे राठोड, घडामोडे म्हणाले. त्याला जास्त किंमत द्यावी असे मला वाटत नाही...लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यात माझे वैयक्तिक योगदान आहे की नाही. माझा जनसंपर्क, केलेली कामे, पक्षसंघटनेवर मी निवडून आलो आहे. मोदी लाटेचा १० टक्के प्रभाव झाला असेल. उपमहापौरांनी जे काही आरोप केले किंवा प्रत्युत्तर दिले आहे, त्याला जास्त किंमत द्यावी असे मला वाटत नाही, असे खा.चंद्रकांत खैरे म्हणाले.
मोदी लाटेवर निवडून आल्याचा खैरेंना विसर
By admin | Published: April 22, 2016 12:50 AM