औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागल्यानंतर आता मतदान केंद्रनिहाय विश्लेषण सुरू झाले आहे. माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा अल्पमतांनी पराभव करीत इम्तियाज जलील यांनी संसदेत मार्ग मिळविला. हा पराभव शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागला असून, कुणाच्या वॉर्डातून किती मते मिळाली याचा आकडा आता समोर येऊ लागला आहे. माजी खा.खैरे यांचे पुतणे तथा नगरसेवक सचिन खैरे, मुलगा ऋषिकेश खैरे यांच्या वॉर्डातून खा. इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जास्तीची मते मिळाली आहेत.
सहा मतदारसंघांतील मतदान केंद्रनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्यानंतर त्यातील गोळाबेरीज सुरू झाली आहे. प्रशासनाने मतदान केंद्र क्रमांकनिहाय मतदानाचे आकडे दिल्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डातील केंद्रावर किती मते शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, अपक्ष उमेदवाराला मिळाली याचा आढावा घेण्यात येत आहे. सचिन खैरे यांच्या बेगमपुरा वॉर्डातून शिवसेनेला १६०० च्या आसपास, तर अपक्ष उमेदवार जाधव यांना १९०० च्या आसपास मतदान झाले आहे. विशेष म्हणजे एमआयएमला मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले आहे. शिवसेना नगरसेवक असताना येथे मताधिक्य मिळू शकले नाही. तसेच खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्या समर्थनगर वॉर्डातूनही शिवसेनेला कमी मतदान झाले आहे. तेथे अपक्ष आणि एमआयएमने बऱ्यापैकी मतदान घेतले आहे. तसेच विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले तरी,जवळपास १२०० च्या आसपास मते अपक्ष उमेदवार जाधव यांना मिळाली आहेत. तेथे २२८२ मते शिवसेनेला मिळाली.
सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघांतून मताधिक्य मिळाले असले तरी ते निर्णायक ठरलेले नाही. शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड पीछेहाट झाली आहे. भाजप नगरसेवक असलेल्या वॉर्डातून शिवसेनेचे मताधिक्य घटले आहे. पूर्व मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरी एमआयएम ७२५ मतांनी पुढेच आहे.
महापौरांच्या वॉर्डात ट्रॅक्टरचा धक्कामहापौर नंदकुमार घोडेले यांच्या वॉर्डातही शिवसेनेला ट्रॅक्टरने धक्का दिला आहे. अपक्ष उमेदवार जाधव व शिवसेनेला बरोबरीचे मतदान झाले आहे.ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी या पट्ट्यात अपक्ष उमेदवार जाधव यांना चांगले मतदान झाले आहे. ४४४२ मतांनी खैरेंचा पराभव झाला असल्यामुळे तो जिव्हारी लागण्यासारखा आहे. शिवसेना नगरसेवकांसह खैरे यांच्या नजीकच्या नगरसेवकांंच्या प्रभावाची थोडी जादू चालली असती, तर हा पराभव झाला नसता असे बोलले जात आहे.