उस्मानाबाद : सतत त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने भावासह इतरांना सोबत घेऊन खून केल्याचा प्रकार ढोकी पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे़ ही घटना ५ आॅगस्ट रोजी घडली असून, या प्रकरणी मंगळवारी मयताची पत्नी, मेहुण्यासह सात जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेतले आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी येथील चंद्रसेन महादेव गुटे हा इसम यवत (पुणे) येथे कामाला होता़ तो मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती़ तो वाकरवाडी येथील रहिवासी असल्याने ढोकी पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर शिंदे यांना याबाबतची माहिती देण्यात आली होती़ सपोनि शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चंद्रसेन गुटे याचा खून करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती़शिंदे यांनी वाकरवाडी येथील काही लोकांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच चंद्रसेन गुटे याचा खून पत्नी बालिका हिच्यासह सात जणांनी केल्याचे समोर आले़ पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसांना माहिती मिळाली की, चंद्रसेन गुटे हा त्याची पत्नी बालिका हिला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून बालिका चंद्रसेन गुटे हिच्यासह मेव्हणा धनंजय भागवत पवार, मेव्हणीचा पती गणेश पांडुरंग शिंदे, वाकरवाडी येथील गोविंद पोपट शिंदे, उमेश महादेव शिंदे, गोविंद पांडुरंग शिंदे, अनंत भजनदास सुरवसे यांनी ५ आॅगस्ट रोजी छोटा टेम्पो करून यवत गाव गाठले़ तेथे असलेल्या चंद्रसेन गुटे याला रात्रीच्या सुमारास पुणे शहरापासून जवळच असलेल्या यवत - जेजुरी मार्गावरील माळशेज घाटात नेऊन दगडाने जबर मारहाण करण्यात आली़ दगडाने जबर मारहाण झाल्याने चंद्रसेन गुटे याचा मृत्यू झाला़ सदर आरोपींनी त्याचे पार्थिव दरीत फेकून देत तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली़ याबाबत ढोकी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, ढोकी पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुटे याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे निदर्शना आले आहे़ (प्रतिनिधी)
वाखरवाडीतील इसमाचा माळशेज घाटात खून
By admin | Published: August 26, 2015 12:41 AM