औरंगाबाद : खाम नदीच्या स्वच्छतेसाठी काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या आठवड्यात लोकसहभागातून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. मनपा कर्मचारी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून ७०० झाडे लाविली, ५ टन सुका कचरा उचलला.
महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी बोर्ड, व्हेराॅक आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम राबविण्यात येत आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्यात येत आहे. शनिवारी (दि.१३) सकाळी ७ ते १० या वेळेत लोकसहभागातून लोखंडी पुलापासून बारापुला गेटपर्यंत स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्यात आले. खाम नदीच्या स्वच्छता मोहिमेत पहिल्या टप्प्यात नदीपात्राचे रुंदीकरण, नदीच्या काठावर टाकलेला कचरा काढून टाकणे, भूमिगत गटार यंत्रणेत ओपन सीवेज जोडणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आदी डिझाइन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय नदीकाठच्या बाजूला वृक्षारोपण आणि रिव्हरफ्रंटचा विकास करण्यात येणार आहे. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, छावणी बोर्ड औरंगाबादचे सीईओ विक्रांत मोरे, औरंगाबाद शहरचे एसीपी (वाहतूक) सुरेश वानखेडे, इको सत्त्वच्या नताशा झरीन, गौरी मिराशी आणि सिद्धार्थ बनसोड, मनपा स्वछता निरीक्षक असदुल्ला खान व अन्य उपस्थित होते.
गरवारे कंपनीतर्फे सहभागी नागरिकांना बिस्किट्स देण्यात आले. या वेळेस मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सचे एनसीसीचे विद्यार्थी, लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले, डॉ. सूरज बनसी, डॉ. महेंद्र वाहूळ, डॉ. प्रियानंद आगळे, प्रयास युथ फाउंडेशन, वी फोर एन्व्हायरमेंट, इको नीडस फाउंडेशन, लाइफ केअर आणि छावणी जन अधिकार मंच सदस्यांनी सहभाग नोंदवला. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, ही लोकसहभाग मोहीम दर शनिवारी राबवण्यात येणार आहे.