फुलंब्री : तालुक्यात खरिपाच्या पेरण्या शंभर टक्के झालेल्या आहेत. अद्याप जोमदार पाऊस पडला नसला तरी, रिमझिम पावसावर पिके जोमात बहरली आहे. यावर्षीचा खरीप आपल्याला पावणार अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ५७ हजार ५७६ हेक्टर आहे. त्यातील ५७ हजार ८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी यंदा सर्वाधिक पसंती कपाशीला दिली असून, २२ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे तर अर्द्रक व उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमूग या पिकांचीही लागवड झाली आहे.
चौकट...
आतापर्यंत सरासरी २०६ मि.मी. पाऊस
पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात तालुक्यात सुमारे २०६ मि.मी. पाऊस पडला असल्याची नोंद तहसील दरबारी झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र पिके तरलेली असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. येणाऱ्या काळात आणखी पाऊस पडण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
चौकट...
पिकाची उगवण चांगली
तालुक्यात खरीप पिकाची लागवड १०० टक्के झाली असून, कपाशी व मका पिके चांगल्या प्रकारे उगवून आली आहे. पुरेसा नसला तरी पिके तरतील असा पाऊस सध्या पडत आहे. शेतशिवारात पिकांमध्ये खुरपणी, कोळपणीच्या कामांचा पहिला टप्पा पार पडला आहे. रासायनिक खतांची मात्रा देणे सुरू असून, औषध फवारणीही केली जात आहे.
धरणातील पाणीसाठा
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे सांजूळ मध्यम प्रकल्पात ५४ टक्के, जातेगाव तलाव ४९ टक्के, फुलंब्री प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा आहे, तर सर्वात कमी ८ टक्के पाणीसाठा वाकोद प्रकल्पात आहे. यामुळे तालुक्याला अद्यापही जोमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यात लागवड झालेली पिके व क्षेत्र
कापूस २२ हजार ८४० हेक्टर
मका २१ हजार ५७१ हेक्टर
तूर दोन हजार ३३३ हेक्टर
मूग ७७८ हेक्टर
सोयाबीन ५४६ हेक्टर
बाजरी ९८६ हेक्टर