- मोबीन खान वैजापूर (औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरिपाची पिके हातातून गेली आहेत. दुसरीकडे आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी मोठा पाऊस न झाल्याने येथील नदी, नाले, तलाव, मोठमोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामुळे बळीराजाने आगामी रबी हंगामाचीही आशा सोडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे यंदा तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे, हे निश्चित आहे.
आतापर्यंत तालुक्यात ५१.७३ टक्के २६९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५१.७३ टक्के आहे. शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपला आहे. त्यामुळे सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. वैजापूर तालुक्यात पावसाच्या या १२० दिवसांत ४८.२७ टक्क्यांची तूट आहे, अशा परिस्थितीत यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीची पिके उगवून येणार किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सप्टेंबरनंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार महिन्यांच्या आकडेवारीवरच आधारित असतात. तसेच या चार महिन्यांत तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडळनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते.
वैजापूर तालुक्यात या कालावधीत ५२० मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही ५१.७३ टक्केवारी आहे. यामध्ये वैजापूर २८७, खंडाळा २४०, शिऊर २८०, लोणी खुर्द २२४, गारज १८९, नागमठाण २६७, बोरसर २७७, महालगाव ३२५, लाडगाव ३०३, लासूरगाव २९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची टक्केवारी पाहता जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणी असेल असे दिसते. मात्र, प्रत्यक्षात पावसात सातत्य राहिले नसल्याने पाणी जमिनीमध्ये मुरले नाही़ त्यामुळे तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार आहे.
उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटसप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी गणेशोत्सवानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. गणेशोत्सवानंतर ऊन पडत असल्याने कपाशी, मका आदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
११ प्रकल्पांत थेंबही नाही तालुक्यात पावसाअभावी ११ प्रकल्प कोरडे आहे, तर शहरातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प, सटाणा व गाढेपिंपळगाव लघुप्रकल्प जोत्याखाली आहे. सद्य:स्थितीत केवळ मन्याड साठवण तलावात १२ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट परिणाम होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार आहे.