औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यास खत आणि बियाणांचा मुबलक साठा मंजूर झाला असल्यामुळे यंदा जिल्ह्यात खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. तसेच शेतकर्यांना यंदा बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विक्रमकुमार यांनी आज कृषी विभागाच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख २५ हजार हेक्टरवर कापूस असेल. यंदा जिल्ह्यात कपाशीच्या बीटी वाणांच्या २१ लाख ७५ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत २१ लाख ११ हजार पाकिटे मंजूर झाली आहेत. आतापर्यंत यातील साडेतीन लाख पाकिटे प्राप्तही झाली आहेत, असे विक्रमकुमार म्हणाले. खतांच्या बाबतीतही समाधानकारक परिस्थिती आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८६ हजार मेट्रिक टन खत लागले होते. या वर्षी २ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार मेट्रिक टन खत मिळाले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कुठेही खत आणि बियाणांची टंचाई भासणार नाही. खत आणि कपाशीच्या बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. शिवाय याबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोयाबीनच्या बियाणांची टंचाई भासेल, असे प्रारंभी वाटले होते. मात्र, आता ही टंचाईसुद्धा भासणार नाही. जिल्ह्यात १० हजार क्विंटल बियाणे लागणार होते. तेवढे बियाणे मिळाले आहे. यंदाही शेतकरी गटांना बांधावर खत देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी गटांनी आपली मागणी तालुका कृषी अधिकार्यांकडे नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात यंदा खत, बियाणे मुबलक
By admin | Published: May 14, 2014 12:24 AM