लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली: कुंडलवाडी बाजार समितीवर नुकत्याच नेमलेल्या प्रशासकीय संचालक मंडळाला स्थगिती देण्यात आली आहे. उपसभापतीपदावर काँग्रेस पदाधिकाºयांची नियुक्ती झाल्यानंतर माजी खा. भास्करराव खतगावकर व ठक्करवाड यांचा भाजप पक्षातंर्गत वाद उफाळला.दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगितीचे आदेश दिले, अशी माहिती जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी दिली. या आदेशाची माहिती मिळाल्याचा दुजोरा जिल्हा निबंधकांनी दिला आहे.१४ आॅगस्ट रोजी कुंडलवाडी बाजार समितीवर प्रशासक व उपप्रशासकासह १८ जणांच्या संचालक मंडळांची नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळात पूर्वश्रमीत काँग्रेसच्या त्यातही माजी खा. खतगावकर यांच्या मर्जितील कार्यकर्त्यांची वर्णी लागली. पण आश्चर्य हेकी उपप्रशासकपदावर काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी व्यंकटराव गुजरीकर यांची नेमणूक झाली. भाजपाप्रणित सरकारकडून चक्क काँग्रेस पदाधिकाºयांची नियुक्ती झाल्याने भाजपाअंतर्गत धूसफूस सुरु झाली. पण कुंडलवाडीचे प्रकरण यापूर्वीच गुजरीकर यांनी न्यायप्रविष्ठ केल्याने सहा महिन्यांपासून नियुक्ती रखडली होती.कुंडलवाडी बाजार समितीत बिलोली व देगलूरप्रमाणे खतगावकर समर्थकाची नियुक्ती झाल्याने निष्ठावंत भाजपा व ठक्करवाड गटात गदारोळ उडाला. जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना सोडून काँग्रेसमधून नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांच्या सगळीकडे नेमणुक झाल्या. परिणामी बिलोली, कुंडलवाडी, देगलूर भाजपामध्ये अंतर्गत वाद होऊन तक्रारी सुरु झाल्या. यासंदर्भात भाजपाचे माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांनी ही सर्व बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडली व भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचे निदशनास आणून दिले.दरम्यान, इकडे खतगावकर गटाला तक्रारीची कुणकुण लागताच काँग्रेसचे व्यंकटराव गुजरीकर यांना दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रवेश देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला व तसा पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले. पण आठवडाभरापूर्वी पूर्वश्रमीत काँग्रेस व काँग्रेसपदाधिकाºयांचे निघालेले संचालक मंडळाचे आदेश वादग्रस्त ठरले आहेत. भाजपाच्या खतगावकर व ठक्करवाड यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी आ. ठक्करवाड यांनी आपली प्रतिष्ठा वापरुन नूतन संचालक मंडळावर स्थगिती मिळविली. परिणामी तालुक्यात एकच राजकीय गोंधळ उडाला आहे.
खतगावकर, ठक्करवाड वाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:30 AM