चिंचोली लिंबाजी-घाटनांद्रा रस्ता : वाहनधारकांच्या जीवाला धोका
चिंचोली लिंबाजी : कन्नड-सिल्लोड-सोयगाव-पाचोरा या चार तालुक्यांना जोडणारा चिंचोली लिंबाजी ते घाटनांद्रा रस्त्यावरील खटकाळी पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला कठडे नाहीत, मुरुमाचा भराव, स्लॅबचे सिमेंटही उखडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. जीर्णावस्थेत आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चिंचोली लिंबाजी परिसरात अतिवृष्टी झाली होती. नदी, नाल्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले होते. या पुरात चिंचोली लिंबाजी ते घाटनांद्रा रस्त्यावरील खटकाळी नाल्यावरील नळकांडी पूल खचला गेला. तर पुलाचा अर्धा भाग पाण्याच्या वेगात वाहूनही गेला होता. परिणामी पुलाला मोठी भगदाडे पडली आहेत. त्यानंतर नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक प्रवाशांनी मुरुमाचा भराव टाकून वाहतूक सुरळीत केली. परंतु, गेल्या पंधरा-वीस दिवसांत पुन्हा पाऊस पडल्याने या पुलावरून जाणे आता कठीण झाले आहे.
चिंचोली लिंबाजी ते घाटनांद्रा रस्ता पाचोरा, सोयगाव तालुक्याला जोडणारा सर्वाधिक जवळचा मार्ग आहे. मागील अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी सातत्याने पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केलेली आहे.
----
प्रवास बनला धोक्याचा
चारचाकी, दुचाकी वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून येथून प्रवास करीत आहेत. रात्रीच्या वेळी पुलावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. जोराचा पाऊस होताच हा नाला पूर्णपणे भरून वाहतो. त्यामुळे वाहतूक बंद केली जाते. परिणामी आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा एकमेकांशी दोन ते तीन दिवस संपर्कही होत नाही.
-----
कन्नड पूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खटकाळी नाला पुलासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु, हा पूल पुन्हा नळकांडी पद्धतीने बांधला जाणार असल्याने त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उंची वाढवून नव्याने पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी मागणी केलेली आहे. जेणेकरून हा प्रश्न कायमचा सुटेल.
- संदीप सपकाळ, जि. प. सदस्य.
290721\20210710_141128.jpg
खटकाळी पूल बनला धोकादायक