खुलताबाद (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील खिर्डी गावच्या शासकीय पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविल्याने खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले असून आजही गावास एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे.खिर्डी गावास मावसाळा येथील रंगमहाल तलावातील शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे गावास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे मावसाळा रंगमहाल तलाव परिसरातील विहिरीजवळ विहिर पुनर्भरण करण्यात आले. त्याचबरोबर विहिरीजवळ खड्डे खोदून या खड्ड्यात दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामदरी तलावातून पाणी आणून ते पाणी परिसरातील खड्ड्यात सोडल्याने विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली व गेल्या पाच वर्षांपासून विहिरीस भरपूर पाणी असल्याने ग्रामस्थांना ते एक दिवसाआड मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत आहे. यंदा पाऊस झाला नाही तरी या शासकीय पाणीपुरवठा विहिरीस मुबलक पाणी असल्याचे सरपंच कृष्णा चव्हाण व प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे यांनी सांगितले. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने शासकीय पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ पाच लाख रुपये खर्च करून दोन बुडक्या विहिरी खोदल्या तसेच त्यात आडवे बोअर घेतले. त्यामुळे या बुडक्या विहिरीचे पाणी विहीर पुनर्भरण कार्यक्रमास वापरून गावकऱ्यांना नळाद्वारे एकदिवसाआड पुरविले जात आहे. त्यामुळे खिर्डी गाव गेल्या पाच वर्षांपासून टँकरमुक्त झाले आहे.
दुष्काळमुक्तीचा खिर्डी पॅटर्न; पाच वर्षांपासून गाव टँकरमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 10:42 PM