औरंगाबाद : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची गुरुवारी दुपारी औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’ झाली. सत्तार यांनी खोतकरांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्याची पुन्हा एकदा गळ घातली. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशी हमीही त्यांनी दिली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यास खोतकरांनी प्रतिसाद दिला नाही.
अब्दुल रशीद पहिलवान व फिरोज लाला तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकर हे दुपारी जालन्याहून नाशिककडे चालले होते. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी सत्तार यांना फोन केला व चहा पिण्याच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते फिरोज पटेल यांच्या बीड बायपास रोडवरील कार्यालयात दोघेच चर्चा करीत बसले. साधारण एक तासभर ही चर्चा चालली. दोन दिवसांत गोड बातमी देतो, असे सत्तार म्हणाले, तर आमची ही वैयक्तिक भेट होती, असे खोतकर यांनी सांगितले.
सत्तार यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे हे खोतकरांना सतत त्रास देत आहेत. आता जर ते दानवे यांच्याविरुद्ध लढले नाहीत, तर त्यांचे राजकारणच संपेल. माझे व खोतकरांचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडेन.
जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी उमेदवार राहू, अशी घोषणा बुधवारी पत्रपरिषदेत अब्दुल सत्तार यांनी केली होती. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच खोतकर व सत्तार यांच्यातील ‘चाय पे चर्चे’ने तर्कवितर्क लावणे सुरू झाले.
खोतकर २ लाख मतांनी विजयी होतील ‘अर्जुन खोतकर हे दोन लाख मतांनी विजयी होतील. ते विजय प्राप्त करतात की, रणछोडदास बनतात, हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ असेही सत्तारांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून खोतकर २३ वेळा दानवेंविरुद्ध लढणारच, असे बोलले आहेत.याची जाणीव त्यांनी ठेवली, तर चकवा निश्चित बसेल, अशा शब्दांत खोतकरांना टोला लगावला.