छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध बीबी का मकबरा परिसरात सुरू असलेल्या उत्खननात आता एक दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा मातीच्या ढिगाऱ्याने बंद झालेला आहे. मातीचा ढिगारा हटविल्यानंतर या दरवाजाचा मार्ग नेमका कुठे जातो आणि तेथे काय आहे, याचा उलगडा होणार आहे.
बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरापासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिव कुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे. उत्खनन सुरू होताच दगडी, विटांचे बांधकाम उघडे पडू लागले. अनेक प्रकारच्या रचना याठिकाणी आतापर्यंत सापडल्या आहेत. अजूनही नव्या बाबी समोर येणे सुरूच आहे. मातीच्या ढिगाऱ्याने बंद असलेला एक दरवाजा येथे आढळून आला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे सहायक अधीक्षण पुरातत्त्वविद डाॅ. प्रशांत सोनोने म्हणाले, सापडलेल्या दरवाजातील मातीचा ढिगारा हटविल्यानंतर त्याचा मार्ग कुठे जातो, हे स्पष्ट होईल.
दुमजली वास्तूची शक्यता?उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी दुमजली वास्तू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, संपूर्ण उत्खनन झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.