खुलताबाद (औरंगाबाद ) : गेल्या सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या खुलताबादकरांसाठी शासनाने तातडीने मंजूर केलेली गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प ही पाणीपुरवठा योजना सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या गुरुवारपासून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन दुष्काळात पाणी मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सध्या गंधेश्वर प्रकल्पात ०.८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, या पाणीसाठ्यावर महिनाभर भागविले जाऊ शकते. येथील गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, शासनाने तातडीने खुलताबाद शहर व इतर गावांसाठी टंचाईग्रस्त विशेष बाब म्हणून १२ कोटी रुपये निधी गंधेश्वर धरणातून गिरिजा मध्यम प्रकल्पापर्यंत (२५ कि.मी.) पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला मंजुरी दिली होती. गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या चारीत टाकून ते खुलताबादकरांना पुरवठा करण्यात येणार असून, गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू होते.
दरम्यान, सध्या गंधेश्वर धरणात ०.८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने हा पाणीसाठा किमान महिनाभर पुरेल, असा विश्वास पाटबंधारे सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी गंधेश्वर ते गिरिजा मध्यम प्रकल्प पाणीपुरवठा योजनेच्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड, नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मच्छिंद्र लिंगायत, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता सचिन तोंडेवाड, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे सिंचन विभागाच्या अधिकारी हजर होते.
एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्णत्वाकडे आता पाईपलाईनचे काम पूर्ण होत आले असून, एक-दोन दिवसांत महावितरणचे एक्स्प्रेस फिडरचे काम पूर्ण होणार असल्याने ही पाणीपुरवठा योजना गुरुवारपासून प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.च्ऐन दुष्काळात सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने खुलताबादकरांना काही प्रमाणात पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.