खुलताबाद : औरंगाबादहून खुलताबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने औरंगाबादला कंपनीत कामासाठी जाणाऱ्या दोन तरूणांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात खुलताबाद येथील एक जण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी कागजीपूरा गावाजवळ घडला. निखील सोमीनाथ खंडागळे(१९) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
राजीवगांधी नगर खुलताबाद येथील रहिवासी निखील खंडागळे व विजय सुभाष आगळे हे दोघे औरंगाबादला कंपनीत कामासाठी बुधवारी सकाळी दुचाकी(एम.एच.२०, सी.के.४३२८)ने निघाले होते. कागजीपूरा येथील एस.टी.परिवहन विभागाच्या बस प्रशिक्षण केंद्राजवळील पुलाजवळ औरंगाबाद येथून येणाऱ्या भरधाव कार(एम.एच.२०,ई.ई.५८९४)ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. कारने दुचाकीला लांबपर्यंत फरफटत नेले. यात दुचाकीचा चुराडा होऊन् निखील खंडागळे याचा जागीच मृत्यू झाला. तर विजय आगळे गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले.
जेवणाचा डबा एका बाजूला पडला होता.
निखील सोमीनाथ खंडागळे व विजय आगळे हे दोघेही अविवाहित असून ते दररोज दुचाकीवर खुलताबादहून औरंगाबादला कंपनीत ये जा करीत होेते. बुधवारी झालेला अपघात इतका भयानक होता की, यात दुचाकीचा चुराडा झाला. तसेच कारचेही समोरचे टायर फुटले. यात निखीलचा मृत्यू झाला असून विजय गंभीर जखमी झाला आहे. दोघांच्याही जेवणाच्या डब्यातील पोळी व भाजी रस्त्यावर विखुरली होती.
फोटो : मयत निखिल सोमीनाथ खंडागळे
फोटो कॅप्शन : १)अपघातस्थळी सर्वत्र विखुरलेल्या जेवनाचा डबा व चपाती.
२) अपघातात कार व दुचाकीचा झालेला चुराडा.