खुलताबाद न.प विविध विकासकामांच्या दोन कोटी रुपयांच्या निविदांचे प्रकरण गाजले होते. अभियंता शेख जुनेद आणि नगरसेवक अयाज बेग यांनी या प्रकरणी निविदा प्रक्रियेत अनियमिता झाल्याचा आरोप करून ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. उच्च न्यायालयाने संबंधित कामांच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती दिली होती. न्या.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या.आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी अर्जदारातर्फे ॲड.एस.एस. ठोंबरे, ॲड.विवेक काकडे यांनी युक्तिवाद केला.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या कामांचा पुन्हा या निविदेत समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार, ३३ टक्के कामे बेरोजगार अभियंता, ३३ टक्के कामे ठेकेदार, तर ३३ टक्के मजूर सहकारी संस्थेला देणे बंधनकारक आहे. मात्र, याची अंमलबाजवणी होताना दिसून येत नाही. विविध योजनांतील विविध कामांना एकत्र करून निविदा काढण्यात आली. या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नसून नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकेत म्हटले.
नगरपरिषदेच्या वतीने ॲड.उषा काळे व सरकारतर्फे ॲड.डी.आर. काळे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही याचिकाकर्त्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला नाही. निविदा प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या असून, सर्व निविदा पारदर्शकपणे पार पाडली गेली, असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या. न्यायालयाच्या या निर्णयावर नगराध्यक्ष ॲड.एस.एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगराध्यक्ष ॲड.कैसरोद्दीन यांनी समाधान व्यक्त केले.