खुलताबाद तालुक्यातील चित्र : दुसऱ्या लाटेत गावात कोरोनाने घातले थैमान
सुनील घोडके
खुलताबाद : जगप्रसिद्ध वेरूळ गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. एकीकडे अशी भयंकर परिस्थिती असली तरी वर्षभरात एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका प्रशासन, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गावात आता बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे.
वेरूळ गाव धार्मिक व पर्यटनदृष्ट्या जगप्रसिद्ध आहे. वेरूळची लेणी, श्री घृष्णेश्वर मंदिर लॉकडाऊनमुळे बंदच असल्याने गावात बाहेरगावावरून येणाऱ्यांची गर्दी आपोआप बंद झाली. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच घेरले. आतापर्यंत ९० रुग्ण बाधित आढळून आले तर एका रुग्णांचा पहिल्या लाटेच्या दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.
वेरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने कोरोना चाचणी त्वरित केल्या गेल्या. संशयित रुग्णांचे ट्रेसिंग लवकर झाले. तालुका प्रशासन, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे तर नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईदेखील केली जात आहे. गावात सुमारे नव्वद टक्के नागरिक मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येते. सोशल डिस्टन्सचे मात्र काटेकोरपणे पालन होताना दिसून येत नाही.
कार्यक्रमातील गर्दीला आवर
वेरूळमध्ये अंत्यसंस्काराच्या विधीला मोजक्याच लोकांची गर्दी असल्याचे समोर आले तर लग्नसोहळे, मुंजीचे कार्यक्रम यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.आर. पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी गावागावात जाऊन कोरोना तपासणी करतात.
आरोग्य केंद्राच्या वतीने २५०० लोकांना लसीकरण
वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ता, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. संसर्ग थोपविण्यासाठी उपाययोजना केल्या. तसेच योग्यवेळी बाधिताना योग्य उपचार दिल्यामुळे मृत्यूच्या संख्येला रोखता आले. असे वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे, ग्रामविकास अधिकारी जी.एस. गायकवाड यांनी सांगितले.
फोटो : वेरूळ गावचा मुख्य रस्ता असा सुनसान असून, तुरळक वाहने व नागरिक दिसत आहे.