- श्यामकुमार पुरेसिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): सिल्लोड तालुक्यातील घाटनांन्द्रा येथील एका तरुणाने शेअर मार्केटमध्ये ३० ते ४० लाख रुपये गमावले. कर्जबाजारी झालेल्या या तरुणाने पैश्यांसाठी गावातीलच चुलत साडुचे अपहरण करून नातेवाईकांना ३० लाख रुपये खंडणी मागितली होती. मात्र, खंडणी मिळाली नसल्याने चुलत साडूचा खून करून मृतदेह शेतातील बांधावर पुरून टाकल्याची सुन्न करणारी घटना तालुक्यातील घाटनांद्रा येथे २५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मृताचे नाव कैलास नामदेव मोरे ( रा. घाटनांद्रा) असे असून संजय राजेंद्र मोरे ( रा.घाटनांद्रा) असे आरोपीचे नाव आहे.
घाटनांद्रा येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास नामदेव मोरे ( ३५) हा शनिवारी ( दि. २१) सकाळी दहा वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी कैलासचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. कैलासचे वडील नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजय लाझेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास दिला. गायब होण्यापूर्वी कैलास हा संजय सोबत शेतात गेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी संजयला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संजयने ३० लाखांच्या खंडणीसाठी कैलासचा खून केल्याची कबुली दिली.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, सिल्लोड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, लहुजी घोडे, सचिन सोनार, राजेंद्र काकडे, अनंत जोशी, रंगराव बावस्कर, ज्ञानदेव ढाकणे,नामदेव शिरसाठ, राजेंद्र लोखंडे,विठलं डोके,वाल्मिक निकम,दीपक सुरोशे, योगेश तरमले, जीवन घोलप,संजय तांदळे यांनी केली. या प्रकारांचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे हे स्वतः गावात तळ ठोकून असल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
कर्ज झाल्याने मागितली खंडणी, पण...माझ्यावर कर्ज झाले होते. पैसे कोठून आणायचे या विचारात असताना कैलासला शेतात नेऊन पैशांची मागणी केली. पण त्याने पैसे दिले नाही. यामुळे कैलासचा ताराने गळा आवळून खून केला. त्यानंतर ''३० लाख तैयार रखो, वरना कैलास की लाश भी नही मिलेगी'' असा मेसेज कैलासच्या भाच्याला करून मृतदेह शेतातील मका पिकात लपवून ठेवले. पैसे मिळाले नसल्याने दुसऱ्या दिवशी मृतदेह शेताच्या बांधावर खड्डा खोडून पुरल्याची कबुली संजयने दिली.
रात्रीच खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढलाबुधवारी रात्री आरोपी संजय राजेंद्र मोरे यास सोबत नेत पोलिसांनी शेतात पुरलेला संजयचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेले असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यानी जागेवरच पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत कैलासच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.